महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २३. जानेवारी – सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून इंधन दरात वाढ सुरूच असून शनिवारी (दि.२३) सलग दुसऱ्या दिवशी तेल कंपन्यानी पेट्रोल, डिझेल दरात वाढ केली. पेट्रोलचे दर २२ ते २५ पैशांनी तर डिझेलचे दर १८ ते २६ पैशांनी वाढले आहेत. दिल्ली आणि मुंबई शहरात पेट्रोलचे दर आतापर्यंतच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले आहेत. (petrol and diesel prices hike continues)
इंधन दरात चालू आठवड्यात झालेली ही चौथी वाढ आहे. ताज्या दरवाढीनंतर दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर ८५.४५ रुपयांवरून ८५.७० रुपयांवर गेले आहेत. दुसरीकडे डिझेलचे दर ७५.६३ रुपयांवरून ७५.८८ रुपयांवर गेले आहेत. चालू आठवड्याच्या सुरुवातीला पेट्रोल दराने ८५ रूपयांची पातळी ओलांडली होती. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे पेट्रोलचे दर ९३.५९ रुपयांवर तर डिझेलचे दर ८३.८५ रुपयांवर गेले आहेत.
देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये इंधन दर क्रमशः ९२.२८ आणि ८२.६६ रुपयांवर पोहोचले आहेत. प. बंगालमधील कोलकाता येथे पेट्रोल, डिझेलचे दर क्रमश ८७.११ आणि ७९.४८ रुपयांवर गेले आहेत. तामिळनाडूतील चेन्नईमध्ये हेच दर क्रमश ८८.२९ आणि ८१.१४ रुपयांवर गेले आहेत.