महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ३१ जानेवारी – सीरम इन्स्टीटय़ूट ऑफ इंडिया कोरोनावरील दुसरी लस येत्या जून महिन्यात उत्पादित करण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी ट्वीट करून दिली आहे.
सीरमने नोवावॅक्ससोबतच्या भागिदारीतून तयार केलेल्या लसीच्या चाचण्या सुरू आहेत. त्याचे निष्कर्ष उत्तम आहेत. भारतात चाचण्या सुरू करण्यासाठी आम्ही परवानगी मागितली आहे. जून 2021 मध्ये ‘कोवोवॅक्स’ लॉन्च करू, अशी आशा आहे, असे पूनावाला यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. या लसीला मान्यता मिळाल्यास ती देशातील तिसरी कोरोना लस ठरेल. सीरमची ‘कोविशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोवॅक्सीन’ या दोन लसींचा देशात सध्या वापर सुरू आहे.
सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असलेल्या सीरम इन्स्टीटय़ूटच्या कोविशील्ड लसीला सर्वात प्रथम परवानगी मिळाली. देशात सध्या ही लस वापरली जात आहे. त्यानंतर आता सीरम नवीन लस सादर करणार आहे.
सीरमने ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्राझेनेकाच्या सहाय्याने कोविशील्ड लस तयार केली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टीटय़ूट येथे या लसीचे उत्पादन केले जाते. सध्या देशभरात या लसीचा वापर मोठय़ा प्रमाणात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील काही दिवसांपूर्वी संस्थेला भेट दिली होती. ‘कोवॅक्सीन’ ही लस हैदराबाद येथील भारत बायोटेकने भारत वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही)च्या सहकायार्नं तयार केली आहे. ती पूर्णपणे भारतीय आहे.