यूटीएस अॅपवरून फक्त ‘या’ वेळेतेच मिळणार लोकलचे तिकीट

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२। मुंबई ।सकाळी ७ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत राज्य सरकारने सामान्यांना लोकल प्रवास करण्याची परवानगी दिलेली नाही. या काळात यूटीएस अॅपवरून कोणत्याही प्रकारचे तिकीट देण्यात येणार नाही. यामुळे सोमवारी विशिष्ट वेळेत तिकीट-पास प्रवाशांना उपलब्ध होत नव्हता, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. (Local Train Tickets on UTS App)

लॉकडाउन काळातील पासला मुदतवाढ देण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र ज्या प्रवाशांनी मोबाइलद्वारे पास काढला आहे व ज्यांचा पास मोबाइलमध्ये दिसत नाही, अशा प्रवाशांच्या पासला मुदतवाढ कशी मिळेल, या प्रश्नावर ‘याबाबत माहिती घेऊ’ असे उत्तर रेल्वे प्रशासनाने दिले. पश्चिम रेल्वेच्या सर्व स्थानकांवरून सोमवारी २ लाख १० हजार २५८ तिकिटांची विक्री झाली. यात १ लाख ८१ हजार १७७ तिकीट आणि २९ हजार ८१ पासचा समावेश आहे. १०,५६७ प्रवाशांच्या पासला मुदतवाढ देण्यात आली आहे. सोमवारी दुपारी ४ पर्यंत ही स्थिती होती. शुक्रवारी २९ जानेवारीला १ लाख ७२ हजार ७३१ तिकिटांची विक्री झाली होती, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली.

करोना संसर्गाची भीती कायम असल्याने राज्य सरकारने मर्यादित वेळेत प्रवासाला परवानगी दिली आहे. रेल्वेला त्यानुसार प्रस्ताव पाठवण्यात आला. यामुळे सर्वांना प्रवास मुभा नसलेल्या वेळेत मोबाइल तिकीट सेवा काही तासांसाठी बंद ठेवण्यात येईल. प्रवास वेळ सुरू झाल्यावर ही सुविधा पुन्हा सुरू राहणार आहे, असेही रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. रेल्वे स्थानकांतील तिकीट खिडक्यांवर पासची मुदत वाढवून घेण्यासाठी प्रवाशांची मोठी झुंबड उडाली होती. त्यातच व्हॉट्सअॅपवर सोमवारनंतर मुदतवाढ मिळणार नाही, असे मेसेज व्हायरल झाले. यामुळे तिकीट खिडक्यांवर लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले.

पास मुदतवाढ १ फेब्रुवारीपासून…
सामान्य प्रवाशांनी लोकल पास अपडेट करून घ्यावेत, सोमवारनंतर पासला मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे संदेश काही प्रवासी संघटनांच्या व्हॉट्सअॅपवर फिरत होते. ‘प्रवाशांच्या पासला मुदतवाढ देताना १ फेब्रुवारीपासून पुढे अशा पद्धतीने मुदतवाढ देण्यात येईल. यामुळे प्रवाशांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये’, असे आवाहन ही रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *