![]()
महाराष्ट्र 24 – पिंपरी-चिंचवड- दिनांक 19 जानेवारी – काशी म्हणजे केवळ एक शहर नाही, तर हिंदू संस्कृतीचा श्वास आहे. त्या काशीतील मणिकर्णिका घाट म्हणजे जीवन-मरणाच्या चक्राचे प्रतीक! अशा पवित्र आणि ऐतिहासिक घाटाच्या कथित उद्ध्वस्तीकरणाच्या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून, त्याचे तीव्र पडसाद पिंपरी-चिंचवड शहरात उमटले. मोरवाडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकातील अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे दर रविवारी होणाऱ्या अखंड साप्ताहिक पूजेच्या वेळी धनगर समाजाने या घटनेचा जोरदार निषेध नोंदवला. “धर्म, परंपरा आणि इतिहासावर आघात झाला तर शांत बसायचे नाही,” असा स्पष्ट इशारा समाजबांधवांनी दिला.
यावेळी उपस्थितांनी मणिकर्णिका घाट ही केवळ वाराणसीची नव्हे, तर संपूर्ण हिंदू समाजाची आस्था असल्याचे ठणकावून सांगितले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी ज्या काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला, त्या परंपरेला तडा देणारी कोणतीही कृती सहन केली जाणार नाही, असे ठाम मत व्यक्त करण्यात आले. “अहिल्यादेवींच्या नावाने स्मारक उभे आहे, पण त्यांच्या विचारांवर घाला घातला जात असेल तर धनगर समाज गप्प बसणार नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी उमटली. या प्रकरणी शहरातील धनगर समाजबांधवांच्या सह्या गोळा करून शासनाकडे निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
या निषेध आंदोलनात मल्हार आर्मीचे शहराध्यक्ष दीपक भोजने, ऑल इंडिया धनगर महासंघाचे अध्यक्ष महावीर काळे यांनी सरकारवर सडकून टीका केली. “मणिकर्णिका घाटाला धक्का म्हणजे हिंदू समाजाच्या अस्मितेला धक्का आहे,” असे सांगत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी सुधाकर अर्जुन, विजय महानवर, सुमेध कावळे, विजय अर्जुन, महेश भोजने, सुभाष हाके, देवराम बिरगड, संभाजी लासके, अदिनाथ यमगर, निलेश वाघमोडे, नागनाथ वायकुळे, विनोद बरकडे, सागर वायकुळे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. निषेधाचे हे आंदोलन म्हणजे केवळ प्रतिक्रिया नसून, सांस्कृतिक अस्तित्वाच्या रक्षणासाठीचा इशारा असल्याचे स्पष्ट झाले.