महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.७। टोरांटो ।स्विडनमध्ये दरवर्षी बनवल्या जाणार्या बर्फाच्या हॉटेलची जगभर चर्चा असते; पण अशा पद्धतीचे हे एकमेव हॉटेल नाही. कॅनडातही बर्फापासून अतिशय कलात्मक आणि भव्य हॉटेल उभे केलेले आहे. या हॉटेलमध्ये टेबल-खुर्चीपासून ग्लासपर्यंत सर्व काही बर्फाचेच आहे!
‘डी ग्लेस आईस हॉटेल’ म्हणून ओळखल्या जाणार्या या हॉटेलमध्ये पंधरा सुईटस्, एक लग्नाचा हॉल, सहा खोल्या आणि एक आईस बारही आहे. दरवर्षी जानेवारीमध्ये हे हॉटेल वेगवेगळ्या थीमवर बनवले जाते. यावर्षीची थीम आहे ‘एका असली दुनियेचा प्रवास’. हे हॉटेल 30 हजार चौरस फूट जागेत बनवलेले आहे. त्यासाठी 15 हजार टन बर्फाचा वापर करण्यात आला. 50 लोकांच्या टीमने सहा आठवड्यांमध्ये हे सुंदर हॉटेल उभे केले. हॉटेलच्या भिंतीची जाडी सुमारे एक मीटर आहे. 19 फूट उंचीच्या या हॉटेलमध्ये बर्फाच्या 2300 लाद्या बसवल्या आहेत. 2001 मध्ये हे हॉटेल पहिल्यांदा उभे करण्यात आले. दरवर्षी जानेवारी ते मार्च या काळात सुरू राहणार्या या हॉटेलची कमाई एक कोटी डॉलर्स म्हणजे सुमारे 73 कोटी रुपये आहे. गेल्या वीस वर्षांच्या काळात या हॉटेलला 20 लाखांपेक्षाही अधिक लोकांनी भेट दिली आहे.