महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.११ । मुंबई । 1 एप्रिल 2020 पासून एकदाही वीजबिल (electricity bill) न भरणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील 14 लाख 29 हजार 811 ग्राहकांनी थकबाकीचा भरणा न केल्यास नाईलाजास्तव वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई पुढील तीन आठवड्यात करण्याचे निर्देश महावितरणचे (MSEDCL) पुणे प्रादेशिक संचालकांनी दिले आहे. महावितरणच्या आर्थिक संकटाचा विचार करून वीजग्राहकांनी थकबाकीचा त्वरीत भरणा करावा व सहकार्य करावे. आवश्यकता असल्यास हप्त्यांची देखील सोय केलेली आहे, असे आवाहनही महावितरणकडून करण्यात आले आहे.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये वीजबिलांच्या थकबाकीसह इतर मुद्द्यांचा आढावा घेण्यासाठी नुकतीच एक व्हिडीओ कॉन्फरंन्सिगद्वारे बैठक पार पडली. यावेळी पुणे प्रादेशिक संचालक (प्र.)अंकुश नाळे यांनी हे आदेश दिले. सद्यस्थितीत पुणे (1032.80 कोटी), सातारा (140.36 कोटी), सोलापूर (259.12 कोटी), सांगली (192.54 कोटी) व कोल्हापूर (337.43 कोटी) जिल्ह्यांमध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे एकूण 1962 कोटी 27 लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी 1247 कोटी 49 लाख रुपयांची थकबाकी असणाऱ्या 14 लाख 29 हजार 811 वीजग्राहकांनी गेल्या 1 एप्रिल 2020 पासून एकाही महिन्याचे वीजबिल भरलेले नाही.
महावितरणकडून वारंवार प्रत्यक्ष संपर्क साधून देखील ग्राहकांनी थकबाकीचा भरणा केलेला नाही. त्यामुळे नाईलाजाने पुढील तीन आठवड्यांत या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येईल. परंतु, त्याआधीच थकबाकीचा भरणा करून ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नाळे यांनी केले.
पश्चिम महाराष्ट्रात गेल्या 10 महिन्यांमध्ये एकदाही वीजबिल न भरणाऱ्या घरगुती ग्राहकांची संख्या सर्वाधिक 12 लाख 68 हजार 487 असून त्यांच्याकडे 856 कोटी 81 लाख रुपयांची थकबाकी आहे. तर 1 लाख 38 हजार 870 वाणिज्यिक ग्राहकांकडे 264 कोटी 32 लाख आणि 22 हजार 454 औद्योगिक ग्राहकांकडे 126 कोटी 35 लाखांची थकबाकी आहे.
वीजबिलांबाबत शंका, तक्रारींचे निरसन तसेच विनंती करून देखील प्रतिसाद नसल्याने या वीजग्राहकांचा वीजपुरवठा या महिन्यातच खंडित करण्याची कटू कारवाई सुरु करण्यात येत असल्याचे नाळे यांनी स्पष्ट केले. या कारवाईसाठी पथके तयार करून आवश्यक संख्येत कर्मचारी उपलब्ध करून देण्यासाठी इतर कार्यालयांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांचा या पथकांमध्ये समावेश करावा, अशी सूचना त्यांनी केली.
पश्चिम महाराष्ट्रात ज्या ठिकाणी पायाभूत वीज वितरण यंत्रणा उभारण्याची गरज नाही अशा ठिकाणच्या व कोटेशन भरलेल्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक नवीन वीजजोडण्या येत्या आठवड्याभरात कार्यान्वित कराव्यात. तसेच कृषीपंप वीजजोडणी धोरण 2020 मधील विविध योजनांची माहिती कृषी ग्राहक, सहकारी संस्था, बचत गट, गावपातळीवरील संस्था, ग्रामपंचायतींना प्रत्यक्ष भेटीद्वारे देण्याची सूचना अंकुश नाळे यांनी केली.