महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१४ । नांदेड । कोरोना संपेपर्यंत ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने विद्यापीठाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थी त्यांच्या पसंतीनुसार परीक्षा देऊ शकतील, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात शनिवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय अॅट नांदेड या उपक्रमासाठी सामंत येथे आले होते. वसतिगृह सुरू करण्याबाबत विचारविनिमय सुरू असून एका खोलीत एक जण असे नियोजन करण्यात येत आहे, असे सामंत म्हणाले.
नांदेडसह मुंबई, नागपूर, अमरावती, पुणे, औरंगाबाद येथील विद्यापीठांमध्ये प्रबोधनकार अभ्यास केंद्र सुरू करण्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यातील २६९ प्राचार्यांच्या भरतीचा निर्णय घेतला असून लवकरच ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. विद्यापीठांमधील ४८ संवैधानिक पदे भरण्यात येणार आहेत.