अमेझॉन इंडिया आता इलेक्ट्रॉनिक उपकरण निर्मिती करणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१७ । मुंबई । अमेझॉनचे भारतातील प्रमुख, अमित अगरवाल यांच्याशी इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे तसेच न्याय व कायदा मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी व्हिडीओ काँफरेंसिंगद्वारे बैठक घेतली. डिजिटल क्षेत्राशी संबधित अनेक बाबींवर या बैठकीत चर्चा झाली. अमेझॉन इंडियाने या बैठकीनंतर भारतात अमेझॉन फायर स्टिक टिव्ही उत्पादन सुरू करणार असल्याची घोषणा केली.

गुंतवणूकीच्या दृष्टीने भारत हा आकर्षण आहेच पण इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक पुरवठा साखळीत मुख्य भूमिका बजावण्यासाठीही आता सज्ज असल्याचे यावेळी दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान तसेच कायदा व न्यायमंत्री रवीशंकर प्रसाद म्हणाले. जागतिक पातळीवरही आपल्या सरकारच्या प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव (PLI) योजनेच्या निर्णयाला भरपूर प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अमेझॉनच्या चेन्नईत उत्पादन युनिट सुरू करण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. यामुळे, स्वदेशी उत्पादनाच्या क्षमता वाढतील व रोजगार निर्माण होतील, असे ते म्हणाले. डिजीटली सामर्थ्यवान आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याच्या उद्दिष्टाचा हा पुढील भाग असल्याचेही त्यांनी सांगितले. अमेझॉनच्या भारतासाठी इलेक्ट्रॉनिक उत्पादने उत्पादित करणे व ती भारताबाहेरही निर्यात करणे या प्रयत्नांचा हा आरंभ असेल असेही रविशंकर यांनी नमूद केले.

या उत्पादनासाठी चेन्नईच्या फॉक्सकॉनची उपकंपनी असलेली क्लाउड नेटवर्क टेक्नॉलॉजी ही अमेझॉनची कंत्राटदार उत्पादन कंपनी असेल आणि या वर्षाअखेरपर्यंत उत्पादनाला सुरूवात होईल. भारतीय कारागिरांनी तयार केलेल्या वस्तू त्याचप्रमाणे आयुर्वेदिक उत्पादने ई-कॉमर्सच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठेत नेण्यास अमेझॉन इंडियाने सहाय्य करावे असे रवीशंकर प्रसाद यांनी सांगितले. अमेझॉन जागतिक कंपनी असली तरी अमेझॉन इंडियाने भारतीय व्यवसाय क्षेत्राशी व संस्कृतीशी नाते जोडणारी भारतीय कंपनी म्हणून भरारी घ्यावी अशी अपेक्षा रविशंकर प्रसाद यांनी यावेळी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *