महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१७ । मुंबई । पेट्रोलियम कंपन्यांची इंधन दरवाढ थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. आज बुधवारी देशभरात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ झाली आहे. आज पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी २५ पैशांनी महागले आहे. या दरवाढीनंतर राजस्थानातील श्री गंगानगर या शहारत साधे पेट्रोल १००.०७ रूपये झाले आहे. देशात पहिल्यांदाच साधे पेट्रोल १०० रुपयांवर गेलं आहे.
इंधन दरवाढ, गॅस सिलिंडर दरवाढीने सर्वसामान्यांच्या खर्चात वाढ केली आहे. आज देशभरात सलग नवव्या दिवशी पेट्रोल-डिझेलमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे राजस्थानमधील श्री गंगानगर मध्ये पेट्रोलने शंभरी गाठली. यापूर्वी महाराष्ट्रातील परभणी, मध्य प्रदेशातील भोपाळ या शहरात पॉवर पेट्रोल (XP) १०० रुपयांवर गेले आहे.आजच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा भाव ९६ रुपये झाला आहे. मुंबईत एक लीटर डिझेलसाठी ग्राहकांना आता ८६.९८ रुपये मोजावे लागतील. राज्यात परभणीमध्ये पेट्रोलचा भाव सर्वाधिक ९८.२५ रुपये आहे.
दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ८९.५४ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ७९.९५ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९१.६८ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८५.०१ रुपये भाव आहे. कोलकात्यात आज पेट्रोल ९०.७८ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८३.५४ रुपये झाला आहे.बंगळुरात पेट्रोल ९१.५४ रुपये असून डिझेल ८४.७५ रुपये झाला आहे.
दरम्यान, जागतिक कमॉडिटी बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. कच्च्या तेलाचा भाव प्रती बॅरल ०.१९ डॉलरने कमी होऊन ५९.८६ डॉलर झाला आहे. तर ब्रेंट क्रूडचा भाव ६३.३५ डॉलर आहे. त्यात ०.०५ डॉलरची वाढ झाली.