महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१७ । मुंबई । राज्यात पुन्हा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्यातील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली.लोक मास्क घालत नसतील किंवा आरोग्याचे नियम पाळत नसतील तर जिल्हा आणि पोलिस प्रशासनावर हे नियम काटेकोरपणे अंमलात आणण्याची जबाबदारी आहे. याबाबत मुलाहिजा न बाळगता कडक दंडात्मक व आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत.
कोरोनाचा संसर्ग वाढत असलेल्या भागात टार्गेटेड पद्धतीने तपासण्या करून एकेका रुग्णाचे किमान 20 तरी संपर्क शोधलेच पाहिजेत, असे ते म्हणाले. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेद्वारे राज्याचा आरोग्य नकाशा तयार केला. त्यातील सहव्याधी रुग्णांची पुन्हा आरोग्य कर्मचार्यांनी विचारपूस सुरू करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.लॉकडाऊन उठविण्यासाठी आग्रही असलेल्या सर्व संस्था, संघटना यांच्याकडून एसओपीची काटेकोर अंमलबजावणी होईल याची खात्री करून घ्यावी, असे मुख्यमंत्री म्हणाले. आवश्यक तेथे पुन्हा कंटेन्मेंट झोन जाहीर करा, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
गेले वर्षभर कोरोनाशी लढताना विविध क्षेत्रांसाठी ठरवून दिलेल्या नियमावलीची अंमलबजावणी होताना दिसत नाही, हे गंभीर आहे. लग्न समारंभ सुरू झाले आहेत, लोकांच्या गाठीभेटी, पार्ट्या व इतर सामाजिक कार्यक्रम कुठल्याही आरोग्याच्या नियमाविना होताना दिसतात. उपाहारगृह, हॉटेल्सच्या वेळा वाढविल्या असल्या, तरी नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या पथकांनी अशा सर्व ठिकाणी भेटी देऊन तत्काळ कारवाई करावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. विवाह किंवा इतर समारंभात मास्क व इतर नियम न पाळणार्या हॉल किंवा सभागृहांचे परवाने रद्द करावेत, असे ठाकरे म्हणाले.
लोकांमध्ये बेफिकिरी आली असली तरी स्थानिक प्रशासन व पोलिसांनी कर्तव्यात ढिलाई न करता हॉटेल्स, उपाहारगृहे नियम पाळत नसतील तर लगेच कडक कारवाई करा, असे ते म्हणाले.सार्वजनिक ठिकाणी पालिकांनी जंतुनाशक फवारणी नियमित करणे सुरू करून गावागावात फिरत्या वाहनाद्वारे लोकांच्या चाचण्या वाढवण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले.