महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१७ । नवीदिल्ली ।येत्या चोवीस तासांमध्ये,अर्थात, आज बुधवारी दुपारपर्यंत चीन लडाखच्या पँगाँग क्षेत्रातून पूर्णतः माघार घेणार आहे. माघार घेण्याची प्रक्रिया गेल्या शनिवारपासूनच सुरू झाली असून ती अपेक्षेपेक्षाही अधिक वेगाने घडत आहे. तथापि, भारत पूर्णतः सावध असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. चीनी सेना पूर्णतः माघारी जाऊन एप्रिल 2020 पूर्वीची स्थिती निर्माण झाल्यानंतरच गोग्रा आणि देपसांग येथील माघारीसंबंधी चर्चा करण्यात येईल, असे भारताने स्पष्ट केले.
मे 2020 मध्ये चीनने लडाखच्या पँगाँग, गोग्रा आणि देपसांग भागात आपली सेना पुढे सारून भारताची सीमारेषा बदलण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, भारतीय सैनिकांनी चीनचा प्राणपणाने आणि निर्धाराने प्रतिकार करून आपल्या सीमांचे संरक्षण केले होते. सीमा परिसरातील ज्या भागांवर भारत आणि चीन हे दोन्ही देश स्वामित्व सांगतात अशा निर्मनुष्य भागात (नो मेन्स लँड) चीनी सेना पुढे येण्याचा प्रयत्न करत होती. तो प्रयत्न लक्षात आल्यानंतर भारतीय सेनेनेही पुढे जाऊन चीनला रोखले होते. त्यामुळे या तीन्ही भागांमध्ये भारत आणि चीन यांच्या सेना एकमेकींच्या डोळय़ाला डोळा भिडलेल्या स्थितीत गेले दहा महिने होत्या. चर्चेच्या अनेक फेऱया होऊनही चीन हटवादीपणा सोडावयास तयार नव्हता. त्याने 50 हजार सैनिक, शस्त्रास्त्रे, रणगाडे आणि चिलखती गाडय़ा आदी सामग्री आणून भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न चालविला होता.
चीनला भारतीय भूमीत एक इंचही येऊ द्यायचे नाही, या निर्धाराने भारताच्या सेनेने व आणि सरकारने आपली भक्कम बांधणी केली आहे. चीनच्या तोडीस तोड सैन्य, शस्त्रास्त्रे, तोफा, रणगाडे आणि इतर युद्धसामग्री भारताकडूनही आणली गेली आहे. शिवाय भारतीय सैनिकांनी दक्षिण पँगाँग परिसरातील सामरिकदृष्टय़ा अत्यंत महत्वाच्या असणाऱया किमान 16 पर्वतशिखरांवर अधिपत्य मिळवून चीनला आश्चर्याचा धक्का देत चीनवरच दबाव आणला आहे.