पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उभारले जाणार भव्य वसतीगृह : आदिवासी विकासमंत्री पाडवी

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१७ । मुंबई ।राज्यभरातून पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या आदिवासी जमातीतील विद्यार्थ्यांना राहण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. यासंबंधी गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांकडून वसतीगृहाची मागणी केली जात होती. या मागणीची दखल आदिवासी विकासमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी घेतली. पुण्यातील हडपसर भागात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्य शासनाने या वसतीगृह इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली आहे.

शैक्षणिक सोयीसुविधा असल्यामुळे राज्यभरातील विविध विद्यार्थी पुण्यात प्रवेश घेत असतात. त्याचप्रमाणे राज्यातील आदिवासी जमातीतील अनेक विद्यार्थी हे पुण्यातील विविध शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश घेतात. मात्र, प्रवेशानंतर अशा विद्यार्थ्यांना राहण्याची सोय होत नसल्यामुळे त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. अशा विद्यार्थ्यांकडून वसतीगृह उभारण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्यांच्या मागणीची पूर्तता करण्याच्या दृष्टीने आदिवासी विकास विभागाने पावले उचलली. पुण्यातील राहण्याची गैरसोय दूर करण्यासाठी हडपसर भागातील मौजे महंमदवाडी येथे आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह इमारत बांधण्यात येणार आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी 44 कोटी 85 लाख रुपयांचे अंदाजपत्रक व आराखडा सादर करण्यात आला होता. या अंदाजपत्रकास आदिवासी विभागाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.

आदिवासी विकासमंत्री पाडवी म्हणाले की, आदिवासी मुलांच्या वसतीगृहाची इमारत नऊ मजली असणार आहे. यामध्ये इयत्ता आठवी ते पदव्युत्तर पदवीपर्यंतच्या सुमारे साडेसहाशे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या वसतीगृहाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पुण्यात येणाऱ्या आदिवासी मुलांसाठी ही एक चांगली सोय होणार असून यामुळे त्यांच्या राहण्याचा प्रश्न सुटणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष देता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *