महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१७ । मुंबई ।करोना संसर्गाचे प्रमाण कमी व्हावे यासाठी राज्य सरकारसह पालिका प्रशासनानेही अथक प्रयत्न केले. मुंबईतील संसर्ग नियंत्रणात आणून दररोज नव्याने वाढणारी रुग्णसंख्या अडीचशे ते तीनशेपर्यंत मर्यादित आणली. पण गेल्या काही दिवसांत हीच संख्या पुन्हा वाढून मुंबईत दररोज नवे पाचशे ते साडेपाचशे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे लॉकडाउन करून पुन्हा कडक नियम लागू करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांच्या बैठकीमध्येही सोमवारी या मुद्द्यांवर चर्चा झाली. समितीमधील वरिष्ठ वैद्यकीय सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाउन करण्याचे मत कुणीही व्यक्त केले नाही. पालिकेने तपासण्यांची तसेच टेस्टिंग व ट्रेसिंगची प्रक्रिया जलदगतीने सुरू ठेवायला हवी. तसेच लसीकरणाचे ध्येय गाठण्यावर लक्ष केंद्रित करत असताना संसर्गाचे प्रमाण कसे कमी होईल, याकडे सातत्याने लक्ष ठेवायला हवे, असे मत व्यक्त केले.
मुंबईत अनेक जणांनी मास्कला सोडचिठ्ठी दिली आहे. लसीकरण झाल्यानंतरही मास्क लावण्याची गरज आहे. मात्र अनेक जणांनी करोना संपला या भ्रमात वावरायला सुरवात केली आहे. शहरांप्रमाणे ग्रामीण भागांमध्येही करोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या ठिकाणी आरोग्यव्यवस्था सक्षम करण्यासह आणीबाणीच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आयसीयूची उपलब्धता वाढवणेही महत्त्वाचे आहे. या मुद्द्यांवर टास्क फोर्समधील सदस्यांचे एकमत झाले.ज्या ठिकाणी नियमांचे पालन होत नाही, त्या ठिकाणी कडक कारवाईचा बडगा उचलण्याची गरज आहे. करोना संसर्गाचे प्रमाण नियंत्रित ठेवायचे असेल तर दिलेल्या निर्देशांचे पालन करणे गरजेचे आहे. संसर्ग योग्यप्रकारे नियंत्रणात येईल, यासाठी पुन्हा लॉकडाउन करण्याची गरज नाही, याकडेही तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.