‘सागरकन्या’ जियाचे एकाच वेळी चार विक्रम

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१८ । मुंबई ।’सागरकन्या’अशी ओळख झालेली कुलाब्यातील जिया राय हिने आठ तास ४० मिनिटे पोहण्याचा नवा विक्रम केला आहे. वांद्रे-वरळी सी-लिंक ते गेट वे ऑफ इंडिया हे ३५ किमी.चे अंतर तिने यादरम्यान पूर्ण केले. स्वमग्नग्रस्त असलेल्या १२ वर्षीय जियाने याद्वारे एकाचवेळी चार विक्रम केले आहेत.

जिया ही लहानपणापासून स्वमग्नग्रस्त आहे. तिच्यातील हा आजार दूर होण्यासाठी तिला पोहण्यास शिकायला टाका, असा सल्ला ती पाच वर्षांची असताना डॉक्टरांनी आई-वडिलांना दिला. त्यानुसार ती केवळ पोहणे शिकलीच नाही, तर एकाहून एक विक्रम करीत आहे. याअंतर्गत तिने १५ फेब्रुवारी २०२० रोजी एलिफंटा ते गेट वे, हे १४ किमी अंतर ३ तास २७ मिनिटांत पूर्ण केले होते. तिच्या त्या विक्रमाची नोंद इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड्स व आशिया बूक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली. त्यानंतर ५ जानेवारी २०२१ रोजी जियाने स्वत:चाच विक्रम मोडत अर्नाळा ते वसई किल्ला, हे २२ किमीचे अंतर सलग सात तास पोहून यशस्वीरित्या पार केले. त्यानंतर आता ३५ किमी.चा नवा विक्रम केला आहे.

जियाचे वडील मदन राय हे नौदलात नाविक आहेत. यामुळे पाण्याबाबत तिला लहानपणापासून ओढ होतीच. मदन राय यांनी सांगितले की, ‘जियाने पहाटे ३ वाजून ५० मिनिटांनी पोहोण्यास सुरुवात केली. ११ वाजतापर्यंत गेट वेला पोहोचणे अपेक्षित होते. परंतु, कुलाब्याच्या दक्षिणेकडील प्राँग्स दीपस्तंभाजवळ समुद्रात मोठे खडक असल्याने लाटांचा जोर वाढला. तिथे वळसा घालताना समुद्र कापायला तिला वेळ लागला. तरीही सलग आठ तास ४० मिनिटे पोहून जिया दुपारी साडेबारा वाजता गेट वेला सुखरूप पोहोचली.’

स्वमग्नग्रस्त असताना सलग आठ तास ४० मिनिटे पोहणे, ३६ किमीचे अंतर जेमतेम साडेआठ तासांत पोहून पूर्ण करणे, वयाच्या जेमतेम १२ व्यावर्षी ३६ किमी आणि आठ तासांहून अधिक काळ सलग पोहणे, असे चार विक्रम याद्वारे जिया राय हिने केले आहेत.

जियाचे आधीचे विक्रम

– १५ फेब्रुवारी २०२० – एलिफंटा ते गेट वे, हे १४ किमी अंतर ३ तास २७ मिनिटांत पूर्ण केले. या विक्रमाची नोंद इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड्स व आशिया बूक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली.

– ५ जानेवारी २०२१ – स्वत:चाच विक्रम मोडत अर्नाळा ते वसई किल्ला, हे २२ किमीचे अंतर सलग सात तास पोहून यशस्वीरित्या पूर्ण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *