कोरोना अलर्ट ; केंद्राचा महाराष्ट्राला इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१८ । मुंबई । कोरोना जातोय, असे वाटत असतानाच हा महामारीचा विषाणू महाराष्ट्रात नव्या जोमाने परतल्याची चिन्हे आहेत. 42 दिवसांनंतर महाराष्ट्रात प्रथमच देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण नोेंदवले गेले. ही परिस्थिती चिंताजनक असून, महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते, असा इशारा विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) प्रमुख डॉ. शेखर मांडे यांनी बुधवारी दिला.देशात आजघडीला महाराष्ट्र आणि केरळ या दोनच राज्यांत कोरोनाची स्थिती तुलनेने अधिक गंभीर आहे. मंगळवारी महाराष्ट्रात 3,663 नवे रुग्ण नोंदवले गेले होते. बुधवारीही 4,787 रुग्ण नोंदवले गेले. केरळमध्येही 3 हजारांपर्यंत कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत ही नवी रुग्णसंख्या अधिक असून, कोरोनाची दुसरी लाट येण्याचीच ही चिन्हे आहेत, असे डॉ. मांडे यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना स्पष्ट केले.

देशभरात लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू असले, तरी लोक विनाकारण रस्त्यांवर उतरून गर्दी करत आहेत. त्यातूनच कोरोना संक्रमणाचा धोका वाढला. घराबाहेर पडताना मास्क लावावा, विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहन करतानाच डॉ. मांडे म्हणाले, कोरोनाला रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन केलाच पाहिजे, असा नाही. मात्र, लोकांनीच आता नियम पाळून कोरोना रोखला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट ही अधिक वेगाने पसरते आणि दुसर्‍या लाटेत मृत्यूचे प्रमाणही अधिक असते. त्यामुळे महाराष्ट्राने आताच सतर्क व्हावे आणि प्रत्येकाने कोरोनाचे नियम पाळावेत, अशी प्रतिक्रिया ‘आयसीएमआर’चे निवृत्त संचालक डॉ. रमण गंगाखेडकर यांनीदेखील व्यक्त केली.

महाराष्ट्रात कोरोना संसर्ग लक्षणीयरीत्या वाढतो आहे. महाराष्ट्राच्या या स्थितीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चिंता व्यक्त केली असून, राज्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण तातडीने वाढवावे, असे आदेश दिले आहेत. देशामध्ये दैनंदिन बाधित रुग्णांमध्ये महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांचा वाटा सुमारे 70 टक्क्यांवर पोहोचला आहे. केंद्रांच्या पथकांच्या पाहणीमध्ये महाराष्ट्रात कोरोना चाचण्यांचे प्रमाण खूपच कमी झाल्याचे आढळून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *