महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१९ । मुंबई । राज्यात पुन्हा कोरोना रुग्णसंख्या (maharashtra coronavirus) वाढू लागली आहे. सरकारनं लॉकडाऊन (lockdown) शिथील केल्यानंतर नागरिक बिनधास्त झाले. शिवाय कोणत्याही कोरोना नियमांचं पालन होताना दिसत नाही आहे. नागरिकांच्या अशा बेजबाबदार वागण्यामुळेच कोरोना संक्रमण पुन्हा वाढलं असल्याचं सांगितलं जातं आहे. पण राज्यातील कोरोना वाढीला फक्त सर्वसामान्यच नाही तर राजकारणीही जबाबदार आहे, असं राज्यातील कोविड 19 टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक (Dr. sanjay oak) म्हणाले.
राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत डॉ. संजय ओक यांनी चिंता व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसात राज्यात कोरोना रुग्ण वेगानं वाढत आहेत, याला लोक तसंच राजकाणीहीह जबाबदार आहेत. राजकीय मेळावे, लग्नसमारंभात मास्क वापरला जात नाही आणि सुरक्षित अंतरही राखलं जात नाही.अशीच परिस्थिती राहिली तर कोरोनाची लाट नव्हे तर लाटा येतील असा इशारादेखील त्यांनी दिला आहे.
एका वृत्तपत्र वाहिनी शी बोलताना डॉ. संजय ओक म्हणाले, “ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी प्रचंड धुरळा उडवला. त्यासाठी राजकीय पक्षांनी जागोजागी मेळावे घेतले. निवडणूक निकालानंतर जल्लोष सुरू होता. पण हे सर्व करताना कुठेही मास्क किंवा सोशल डिस्टन्सिंगचं पालन झालं नव्हतं. याशिवाय लग्न समारंभासह विविध सार्वजनिक कार्यक्रमात सरकारनं लागू केलेल्या कोणत्याही नियमांचे पालन होताना दिसत नाही. मुंबईत लोकल प्रवास सर्वांसाठी सुरू झाला आहे. मंदिर, हॉटेल, बार, रेस्टॉरंट जोरात सुरू आहेत. यामुळेच कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. एका रुग्णामागे संपर्कातील 20 लोकांना शोधण्याचे आदेश सरकारने जारी केले. पण त्याचेही कुठे पालन होताना दिसत नाही”
“युरोपमधील अनेक देश असेच बेसावध राहिले आणि त्यांना त्याची किंमत मोजावी लागली. यातील बहुतेक देशांनी पुन्हा लॉकडाउन जारी केला. महाराष्ट्रातही लोकांनी काळजी घेतली नाही तर पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल. आम्ही राज्य कृती दल म्हणून या सर्व बाबी सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. यावर कठोर कारवाई केली नाही तर कोरोनाची दुसरी लाट आल्याशिवाय राहाणार नाही”, असा इशारा डॉ. ओक यांनी दिला आहे.