महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२२। असीर । वाळवंटी प्रदेश असलेल्या अत्यंत उष्ण हवामानाच्या सौदी अरेबियात बर्फवृष्टी झाली आहे. मागील 50 वर्षांतील सर्व विक्रम या बर्फवृष्टीने मोडलेले आहेत. असीर या भागात सर्वाधिक बर्फवृष्टी झाली.सौदीतील काही भागांमध्ये बर्फवृष्टी होत असते. मात्र, एरव्ही या बर्फवृष्टीचे प्रमाण अत्यंत तुरळक असते. जवळपास 50 वर्षांनंतर अशा प्रकारची हिमवृष्टी सौदीत झाल्याचे म्हटले जाते. सौदी अरेबियातील ताबूक हा भाग बर्फवृष्टीसाठी ओळखला जातो. थंडीच्या दिवसांत सौदी अरेबियातील नागरिकांसह पर्यटकांची या भागात गर्दी होते. पण अन्यत्र विशेषत: असीर भागात झालेल्या बर्फवृष्टीमुळे सौदी अरेबियाच्या अनेक भागांतील तापमान शून्य अंश सेल्सिअसवर पोहोचले होते.
साधारणपणे एक आठवड्यापूर्वी आखाती देशांमध्ये थंडी सुरू झाली. रात्री वाहणार्या थंड हवेमुळे सौदीतील नागरिकांना रात्री थंड आणि दिवसा उष्ण हवामानाला सामोरे जावे लागत आहे.उत्तर आफ्रिकेतील सहारा वाळवंटातील अल्जेरियामध्येही बर्फवृष्टी झाली. सर्वत्र वाळूने सफेद चादर अंथरलेली होती. उणे तीन अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमान पोहोचलेले होते.