महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२४। पुणे । पालकांनी दहावी-बारावीच्या परीक्षेबाबत मनात कोणताही संभ्रम ठेवू नये. बोर्डाच्या परीक्षा नियमितपणे आणि ऑफलाइन पद्धतीनेच होतील, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले.आजपासून दोन महिन्यांनी बोर्डाची लेखी परीक्षा (बारावीची) सुरू होणार असून त्यादृष्टीने राज्य मंडळ तयारी करत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फटका या परीक्षेवर बसेल, असे गृहित धरण्याची आवश्यकता नाही. यापूर्वीही कोरोनाच्या संकटकाळात मंडळाने दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा (फेरपरीक्षा) ऑफलाइन पद्धतीने घेतलेली आहे. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यात होणारी नियमित परीक्षा ऑफलाइनच होईल, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले आहे.
दरवर्षी जवळपास ३० लाख विद्यार्थी दहावी-बारावी बोर्डाची परीक्षा देतात. यंदाही सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाइनच होणार आहे. मुळातच दहावीची परीक्षा ही माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा, तर बारावीची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा असते. त्यामुळे ही परीक्षा ‘ऑनलाइन’ घेणे अशक्य आहे. तसेच बोर्डाची परीक्षा ऑनलाइन घेण्याचा राज्य मंडळाचा कोणताही विचार नाही, असे दिनकर पाटील यांनी सांगितले.
राज्य मंडळातर्फे दहावी-बारावीच्या नियमित परीक्षेसाठीचे नियोजन सुरू आहे. एरवी एका बाकावर एक विद्यार्थी अशी परीक्षेची आसन (बैठक) व्यवस्था असते. परंतु, कोरोनामुळे एका बाकावर एक विद्यार्थी, त्याशिवाय दोन विद्यार्थ्यांमध्ये ठराविक अंतर (म्हणजे एक बाक सोडून एका बाकावर विद्यार्थी) असे नियोजन सुरू आहे. एका वर्गात २५ विद्यार्थी असावेत, यादृष्टीने आसन व्यवस्था करण्यात येईल. त्यातही शाळांना वर्ग खोल्यांच्या आकारमानानुसार ठराविक अंतर राखून विद्यार्थ्याची आसन व्यवस्था करण्यास सांगण्यात येईल. कोरोनाकाळात काय काळजी घ्यावी, कशी रचना करावी, याबाबत स्वतंत्र नियमावली शाळांना देण्यात येईल, असेही राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.
आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेसाठी नोंदणी झालेले विद्यार्थी
दहावी : सुमारे १६ लाख ४२ हजार
बारावी : सुमारे १२ लाख ७३ हजार