राज्यातील या पाच जिल्ह्यांत धोका जास्त ; नवे काेराेना रुग्ण आढळण्याचे प्रमाण जास्त

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२४। मुंबई । राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती आणि ठाणे या प्रमुख पाच जिल्ह्यांत काेराेनाचे नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण ६५ टक्के आहे. त्यामुळे तेथील चिंता आणखी वाढली आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीच्या कालावधीत घट झाली आहे. १५ फेब्रुवारी रोजी ताे ४५५ दिवस होता, तर २१ फेब्रुवारी रोजी ३७१ दिवसांवर आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये राष्ट्रीय पातळीवरील तुलना करता मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग दिसून येत होता. सध्या मुंबईत २२ फेब्रुवारीपर्यंत एकूण ३ लाख १९ हजार ८८८ कोरोनाबाधित असून बळींचा आकडा ११ हजार ४४६ आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या ७ हजार ३९७ आहे.

कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत असल्याने महापालिकेने सर्व कोविड काळजी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एका आठवड्याच्या कालावधीत ही केंद्रे सुरू करण्याचे निर्देश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सर्व सहायक आयुक्तांना दिले. कोरोना काळजी केंद्रांत ७० हजार ५१८ खाटा उपलब्ध आहेत.विदर्भात मागील पाच दिवसांत दोन हजारांहून अधिक नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. या ठिकाणी मृत्युदर २.४१ टक्के आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.९ टक्के इतके आहे. विदर्भातील स्थानिक प्रशासन संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी करीत आहे.

काेराेना लसीकरणाच्या माेहिमेला गती देण्यासाठी आणखी खासगी रुग्णालयांचा वापर करणार असल्याचे केंद्रीय आराेग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले. सध्या देशभरात १० हजार रुग्णालयांचा वापर करण्यात येत आहे. त्यात २ हजार रुग्णालये खासगी आहेत. लसीकरणामध्ये खासगी क्षेत्राची भूमिका खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे लवकरच आणखी खासगी रुग्णालयांचा वापर लसीकरणासाठी करण्यात येईल, अशी माहिती भूषण यांनी दिली.

मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, ठाणे या पाच जिल्ह्यांत कोरोनाचे नवे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. यवतमाळ आणि अकोल्यातही काही अंशी रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे.राज्यातील वाढता संसर्ग ही दुसरी लाट नाही. सर्वसामान्यांच्या शिथिलतेमुळे रुग्ण वाढत आहेत. पुन्हा एकदा राज्य शासनाच्या वतीने नियमांमध्ये कठोरता आणण्यात येत आहे.- डॉ. प्रदीप व्यास, सचिव, आरोग्य विभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *