महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. २५ जानेवारी | पूर्वी घराची चावी हरवली की काळजी वाटायची; आता पासवर्ड लीक झाला तरी आपण निवांत स्क्रोल करतो—हीच आधुनिक माणसाची खरी शोकांतिका! तब्बल १४ कोटी ९० लाख लॉगिन आणि पासवर्ड लीक झाले, तेही जीमेल, फेसबुक, इंस्टाग्राम, नेटफ्लिक्ससारख्या “विश्वसनीय” प्लॅटफॉर्मचे. म्हणजे आपला ईमेल, फोटो, चॅट, ओटीपी, आणि रात्री नेटफ्लिक्सवर काय पाहिलं—सगळं कुणाच्या तरी हार्डडिस्कवर पडून आहे! WIRED च्या अहवालानुसार हा डेटा कुठल्याही कुलूप-किल्लीशिवाय उघडाच उपलब्ध होता. “आपण पासवर्ड गुप्त ठेवतो, पण कंपन्या तो सगळ्यांना दाखवतात!” डिजिटल युगात सुरक्षितता ही फक्त जाहिरातीत असते, वास्तवात मात्र ती ‘Terms and Conditions’इतकीच दुर्लक्षित!
या लीकमध्ये नेमकं काय गेलं, ते ऐकलं की डोक्याला हात लागतो. ४८ दशलक्ष जीमेल अकाउंट्स, १७ दशलक्ष फेसबुक, ६.५ दशलक्ष इंस्टाग्राम, लाखो टिकटॉक, याहू, आउटलुक—म्हणजे सोशल आयुष्याचं संपूर्ण वस्त्रहरण! त्यात भर म्हणजे नेटफ्लिक्स, डिस्ने प्लस, एचबीओ मॅक्ससारखी मनोरंजन अॅप्स. आता हॅकरला तुमचा पासवर्ड माहीत आहेच, पण तुम्ही कोणती सिरीज अर्धवट सोडली, हेही त्याला ठाऊक आहे! आर्थिक आणि सरकारी खात्यांचेही साडेचार लाख लॉगिन लीक झाले—म्हणजे प्रश्न फक्त फोटो किंवा पोस्टचा नाही, तर थेट पैशांचा आणि ओळखीचा आहे. गंमत अशी की हा डेटा शोधणारा सुरक्षा विश्लेषक ओरडतोय, पण सामान्य युजर म्हणतोय—“आपल्याला काय फरक पडतो?” ही बेफिकिरीच हॅकर्सची खरी कमाई आहे.
मग प्रश्न उरतो—आता करायचं काय? उत्तर सोपं आहे, पण आपण ते टाळतो. एकच पासवर्ड दहा ठिकाणी वापरणं, जन्मतारीख, नाव, ‘123456’ किंवा ‘password’ ठेवणं—आणि नंतर हॅक झाल्यावर देवाला दोष देणं! कंपन्या म्हणतात, “तुमचा डेटा सुरक्षित आहे,” आणि लीक झाल्यावर म्हणतात, “तुमचा पासवर्ड बदला.” “डिजिटल जगात वापरकर्ता राजा नाही, तो फक्त आकडा आहे!” त्यामुळे दोन-स्तरीय सुरक्षा, मजबूत पासवर्ड, आणि वेळोवेळी बदल—हे उपदेश नव्हे, तर गरज आहे. कारण पुढची बातमी येईपर्यंत प्रश्न एकच असेल—“यावेळी माझं अकाउंट होतं का?”
