रुग्ण वाढल्यास मुंबईतही लॉकडाऊन : पालकमंत्र्यांनी दिले संकेत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. २४ – महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोके वर काढले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात काही ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आले आहे. तर काही जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लावली गेली आहे. त्याच पर्श्वभूमीवर रुग्ण वाढले तर मुंबईत देखील पुन्हा एकदा लॉकडाऊन होऊ शकतो, असे संकेत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत. कोरोना संसर्ग रोकायचा असेल तर विशेष लक्ष द्यावे लागेल, असेही ते म्हणाले.

दरम्यान, मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढत असल्याने मुंबईची लाइफलाइन मानली जाणारी लोकल पुन्हा बंद होईल का या विचाराने मुंबईकरांची धाकधूक वाढली आहे. याबाबत अस्लम शेख यांना विचारले असता त्यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

ते म्हणाले, लोकल बंद होऊ नयेत, तशी परिस्थिती येऊ नये म्हणून आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला आहे. आवाहन करून लोक ऐकत नसतील तर कारवाई होईल. हॉटेल, नाईट क्लबवर कारवाई सुरू आहे. लॉकडाऊन नको असेल तर मुंबईकरांनी जबाबदारीने वागले पाहिजे. स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. मात्र, परिस्थिती बिघडल्यास पुन्हा लॉकडाऊन लावावे लागेल असेही अस्लम शेख यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *