महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२५। बेळगाव । केरळ आणि महाराष्ट्रातून कर्नाटकात येणार्यांवर बंदी घातलेली नाही. केवळ 72 तासांमधील कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सक्तीचा केल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली. येथे आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्र-कर्नाटक आणि केरळ-कर्नाटक सीमेवर तपासणी नाके स्थापन केले आहेत. कर्नाटकात प्रवेश करणार्या प्रत्येकाचा कोरोना चाचणीचा अहवाल तपासला जात आहे. निगेटिव्ह असणार्यांनाच प्रवेश दिला जात आहे. याबाबत विनाकारण गोंधळ निर्माण केला जात आहे. कर्नाटकात प्रवेश करण्यावर कुणालाही बंदी घातलेली नाही. दरम्यान, महाराष्ट्रातून कर्नाटकात रेल्वेने येणार्यांची तपासणी केली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे. कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असेल तरच प्रवेशासाठी मुभा देण्यात येत आहे. अन्यथा माघारी पाठवण्यात येत आहे.
गुलबर्गा सीमेवर बुधवारी अंत्यक्रियेसाठी आलेल्यांकडे कोरोना चाचणी अहवालाची मागणी करण्यात आली. पण, त्यांच्याकडे अहवाल नसल्याने त्यांना माघारी पाठवण्यात आले. अनेकदा विनंती करूनही अधिकार्यांनी त्यांना सोडले नाही. त्यामुळे त्यांना माघारी परतावे लागले.