महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – वॉशिंग्टन – दि. २५ – करोनाच्या थैमानाशी दोन हात करत असलेल्या अमेरिकेत आता तिसरी लस उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने जॉन्सन अॅण्ड जॉन्सनने विकसित केलेली लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता या लशीच्या वापरास काही दिवसांत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या लशीचा एकच डोस पुरेसा ठरणार आहे.करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी काही देशांमध्ये लसीकरण सुरू करण्यात आले आहे. इतर लशींचे दोन डोस घ्यावे लागतात. तर, जॉन्सन अॅण्ड जॉन्सनचा एकच डोस पुरेसा ठरणार आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, करोना आजाराच्या मध्यम ते गंभीर स्वरुपाच्या आजाराला रोखण्यासाठी ही लस जवळपास ६६ टक्के प्रभावी आहे. इतकंच नव्हे तर ही पूर्णपणे सुरक्षित आहे.
जॉन्सन अॅण्ड जॉन्सनच्या या करोना लशीमुळे लसीकरण मोहिमेला वेग येण्याची अपेक्षा एफडीएने व्यक्त केली आहे. या लशीला मंजुरी मिळाल्यास अमेरिकेत करोनावर तीन लशी उपलब्ध असणार आहे. जॉन्सन अॅण्ड जॉन्सनच्या लशीला मान्यता देण्याबाबत शुक्रवारी होणाऱ्या एफडीएच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते.अमेरिकेत आतापर्यंत जवळपास चार कोटी ४० लाखजणांना फायजर अथवा मॉडर्नाच्या लशीचा किमान एक डोस देण्यात आला आहे. तर, दोन कोटी लोकांना लशीचा दुसरा डोस मिळाला आहे. या लशी ९० ते ९५ टक्के प्रभावी असल्याचे चाचणीत आढळले आहे.
मागील काही महिन्यांपासून जॉन्सन अॅण्ड जॉन्सनने विकसित केलेल्या लशीची चाचणी सुरू होती. जवळपास ४४ हजार जणांवर लस चाचणी करण्यात आली. चाचणीत सहभागी झालेल्या एकाही स्वयंसेवकांवर दुष्परिणाम झाला नसल्याचे सांगण्यात आले. लस चाचणी अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका खंडातील काही देशांमध्ये घेण्यात आली .जॉन्सन अॅण्ड जॉन्सनची लस शून्य तापमानात ठेवण्याची आवश्यकता नाही. त्याशिवाय दोनऐवजी एकाच डोसमध्ये रोगप्रतिकारक शक्ती विकसित केली जाऊ शकते.