महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २८ – मुंबई – सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाविषयी चर्चा करण्यासाठी आज (ता. २८) सह्याद्री अतिथिगृहावर बैठक होत आहे. ही बैठक चार वाजता होणार आहे. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, केंद्रीय न्याय व विधी मंत्री रविशंकर प्रसाद, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य तसेच सरकारचे कायदेविषयक सल्लागार आणि तज्ञ यांच्यासोबत ही बैठक होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मराठा आरक्षाबाबत त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. शनिवारी उदयनराजे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच चर्चा रंगली.