महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ३ मार्च – नागपूर –मोदी सरकार २.० मध्ये रस्ते विकास मंत्रालय सांभाळणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गेल्या तीस दिवसात त्यांनी दोन नवी रेकॉर्ड्स नोंदविली आहेत. मोदी सरकारमधील बेस्ट परफॉर्मर मंत्र्याच्या मध्ये नितीन गडकरी सामील आहेतच आणि त्यांचे निर्णय अनेकांना नेहमीच कोड्यात टाकत असतात असे बोलले जाते. मोटर वाहन संशोधन कायदा लागू करणे, रेकॉर्ड वेळात रस्ते आणि पूल बांधणी यासाठी गडकरी नेहमीच चर्चेत राहिले आहेत.
त्यांच्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय)ने १८ तासात एनएच ५२ वर विजयपूर सोलापूर मार्गावर चार लेनच्या २५.५४ किलोमीटर मार्गाच्या सिंगल लेन तयार करून नवीन विश्व रेकॉर्ड नोंदविले असून त्याची नोंद लिम्का बुक मध्ये होऊ शकते अशी माहिती गडकरी यांनी त्यांच्या ट्विटर अकौंट वरून दिली आहे. त्याचबरोबर हे काम करणारी ठेकेदार कंपनी, त्यांचे ५०० कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.
गडकरी यांनी देशातला पहिला सीएनजी ट्रॅक्टर लाँच करून दुसरे रेकॉर्ड केले आहे. रावमेट टेक्नो सोल्युशन व टॉमासेटो अॅसील इंडिया यांनी भागीदारीत याची निर्मिती केली आहे. या ट्रॅक्टरच्या मदतीने सर्वसामान्य शेतकरी वर्षाला दीड लाखाची बचत करू शकेल असा सरकारचा दावा आहे. शिवाय हा ट्रॅक्टर डिझेल च्या तुलनेत ५० टक्के कमी कार्बन उत्सर्जन करतो त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा तो फायद्याचा आहे असे सांगितले जात आहे.
गडकरी यांनी लवकरच नवीन इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लाँच केला जाणार असल्याचे संकेत दिले आहेत मात्र त्याविषयी अधिक माहिती दिलेली नाही. गतवर्षी डिसेंबर मध्ये सोनालिका कंपनीने भारतातील पाहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर टायगर नावाने लाँच केला होता. त्याची किंमत ५.९९ लाख होती.