महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ३ मार्च – मुंबई – मुंबईत यंदा दरवर्षीच्या तुलनेत तापमानाचा पारा अधिक वाढणार आहे. दरवेळीच्या तुलनेत यंदा उन्हाळय़ात मुंबईचा पारा 3 ते 4 अंश सेल्सियसने अधिक वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. परिणामी येत्या काळात मुंबईकरांना उन्हाचे जबर चटके बसणार आहेत.मंगळवारीच त्याचा प्रत्यय मुंबईकरांना बसला असून सांताक्रूझ वेधशाळेत तापमानाचा पारा तब्बल 35.4 अंश सेल्सियसवर पोहचला होता. तर मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानाचा पारा इथपर्यंत पोहचल्याने येत्या काळात मुंबईकरांचा घामटा निघणार आहे.
राज्यात यंदा अवकाळी पावसाने थैमान घातल्यानंतर येत्या काळात उन्हाचे चटके बसण्याची शक्यता आहे. अरबी समुद्राच्या वायव्य भागांत आणि मध्य महाराष्ट्राच्या परिसरात चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने काही ठिकाणी ढगाळ वातावरण असले तरी अनेक ठिकाणी कोरडे हवामान निर्माण झाले आहे.
त्यामुळे राज्यातील अनेक भागांत उन्हाचे चटके बसू लागले आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी गायब झाली आहे. त्यानुसार हवामान खात्याने दर्शविलेल्या अंदाजानुसार राज्यापाठोपाठ उत्तर हिंदुस्थानात येत्या काळात तापमानाचा पारा दरवर्षीच्या तुलनेत वाढ होणार आहे.
येत्या मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात उत्तर हिंदुस्थानात उन्हाचे चटके बसणार असल्याने मुंबईकरांना त्याचा फटका बसणार आहे. तर दक्षिण आणि मध्य हिंदुस्थानात परिस्थिती सामान्य राहील, असा अंदाज यावेळी हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.हवामान खात्याने दर्शविलेल्या अंदाजानुसार जलवायू परिवर्तनामुळे हिंदुस्थानच्या अनेक ठिकाणी यंदा दुष्काळ पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचा थेट परिणाम कृषी क्षेत्रावर बसणार असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्रात ही अनेक ठिकाणी अशी परिस्थिती उद्भवू शकते, असे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.
हवामानातील उष्णता वाढत असल्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. वेळीवेळी पाणी प्या, शरीराला थंड करणाऱया भाज्या आणि फळं घेणे आवश्यक असून शरीराला त्रास होईल असं काहीही खाऊ नका, असा सल्लाही यावेळी देण्यात आला आहे. मुंबईपाठोपाठ मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातदेखील तापमानाचा पारा अधिक असणार आहे.राज्यापाठोपाठ उत्तर आणि मध्य हिंदुस्थानात 1 मार्चपासूनच तापमानात नेहमीच्या तुलनेत 3 ते 5 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.