महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ३ मार्च – उज्जैन – शिक्षणाला वय नसतं. माणूस आयुष्यभर शिकत असतो आणि पुढे जात असतो. उज्जैनच्या शशिकला रावल यांनी हेच दाखवून दिले आहे. वयाच्या 80 व्या वर्षी शशिकला यांनी संस्कृतमध्ये पीएचडी मिळवली आहे.शशिकला रावल या मध्य प्रदेश सरकारच्या शिक्षण विभागातून लेक्चरल म्हणून निवृत्त झाल्या आहेत. त्यानंतर त्यांनी 2009- 2011 या काळात एम. ए. केले. त्यानंतरही त्या थांबल्या नाहीत. त्यांनी वराहमिहीरचा ज्योतिष ग्रंथ ‘बृहत संहिता’ वर पीएच.डी. करायचे ठरवले.
याविषयी शशिकला सांगतात, मला नेहमीच ज्योतिषशास्त्राची आवड होती. म्हणून ज्योतिर्विज्ञान हा विषय घेऊन मी एम. ए. च्या वर्गाला प्रवेश घेतला. त्यानंतर पुढे शिकावं असं वाटत राहिलं. म्हणून मी ‘बृहत संहिता’ वाचली आणि पीएच. डी. करण्याचे ठरवले. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करून आयुष्याला वेगळी दिशा मिळाली असून आपल्या ज्ञानाचा वापर जनतेच्या हितासाठी करणार असल्याचे शशिकला यांनी सांगितले. अंधश्रद्धेच्या आहारी न जाता ज्योतिष कालगणनेतून मिळणाऱया संकेतांना समजून घेतले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.