महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ३ मार्च – नवीदिल्ली –कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) 4 मार्च 2021 रोजी आर्थिक वर्ष 2020-21 साठी ईपीएफवरील व्याजदरांबाबत (EPF Interest Rates) घोषणा करण्याची शक्यता आहे. कारण उद्याच सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (CBT) ची श्रीनगरमध्ये बैठक आहे. या बैठकीमध्ये ईपीएफओचे उत्पन्न आणि आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीत आर्थिक वर्ष 2020-21 साठी व्याजदराची घोषणा करण्याच्या प्रस्तावावर देखील निर्णय होण्याची शक्यता आहे. यावेळी ईपीएफओ कडून सहा कोटी सब्सक्रायबर्सना झटका मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
बोर्डाने अलीकडेच अशी माहिती दिली होती की, ईपीएफओ सब्सक्रायबर्सना 31 मार्च 2021 च्या अखेरपर्यंत 8.50 टक्के व्याजदर दोन टप्प्यांमध्ये चुकवला जाईल. पहिल्या हप्त्यामध्ये सब्सक्रायबर्सना 8.15 टक्के तर दुसऱ्या हप्त्यामध्ये 0.35 टक्के व्याजदराचे पेमेंट केले जाईल. ईपीएफओ बोर्डाचे सदस्य वृजेश उपाध्याय यांनी असे म्हटले होते की, आर्थिक वर्ष 2019-20 साठी व्याजदरात कोणतीही कपात करण्यात आली नाही आहे, मात्र सध्याची परिस्थिती पाहता व्याजदर दोन हप्त्यात चुकवला जाईल.
ईपीएफओचे एक ट्रस्टी केई रघूनाथन यांनी अशी माहिती दिली होती की, 4 मार्च रोजी होणाऱ्या बैठकीविषयी त्यांनी सूचना मिळाली होती. या बैठकीच्या अजेंडाबाबत त्यांनी माहिती दिली नव्हती. अशावेळी चर्चा आहे की, ईपीएफओ आर्थिक वर्ष 2020-21 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर व्याजदरात कपात करू शकते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कोरोना काळात मोठ्या प्रमाणात पीएफ खात्यातून पैसे काढण्यात आले. मात्र त्या तुलनेत सब्सक्रायबर्सचे योगदान कमी झाले आहे. 2019-20 साठी भविष्य निर्वाह निधीवरील व्याज दर 8.5 टक्के होता.
मार्च 2020 मध्ये ईपीएफओने आर्थिक वर्ष 2019-20 साठी भविष्य निर्वाह निधीवरील व्याज दर कमी कर त 8.5 टक्के केला होता. गेल्या काही वर्षातील हे सर्वात कमी व्याज आहे. याआधी 2012-13 मध्ये व्याजदर 8.5 टक्के करण्यात आला होता. आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये पीएफ सब्सक्रायबर्सना 8.65 टक्के व्याज मिळत होते, 2016-17 मध्ये हे व्याज 8.65 टक्क्यांनी मिळत होते, 2017-18 आणि 2015-16 साठी व्याजदर 8.8 टक्के होता. 2013-14 साठी पीएफच्या रकमेवरील व्याजदर 8.75 टक्के होता.