महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ३ मार्च – सातारा –संपूर्ण देशात इंधनाचे भाव गगनाला भिडल्यामुळे आता चोरट्यांनी मौल्यवान वस्तुंप्रमाणे पेट्रोल (Petrol) आणि डिझेलवर (Diesel) डल्ला मारायला सुरुवात केली आहे. साताऱ्यातील सासवडमध्ये असाच एक प्रकार समोर आला. याठिकाणी चोरट्यांनी हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीची पेट्रोल वाहून नेणारी पाईपलाईनच फोडली. त्यानंतर हजारो लीटर पेट्रोल घेऊन हे चोरटे पसार झाले. (Petrol and Diesel robbery in Maharshtra)पेट्रोल चोरून झाल्यानंतर चोरटे पाईपलाईन तशीच सोडून येथून निघून गेले. त्यामुळे गळती लागलेल्या पाईपलाईनमधून बाहेर पडत असलेले हजारो लीटर पेट्रोल जमिनीत मुरले.
मुंबई-पुण्याहून सातारा आणि सोलापूरकडे पेट्रोल वाहून नेण्यासाठी असलेल्या पाईपलाईनचा भाग सासवडमधून जातो. ही 223 किलोमीटरची पाईपलाईन आहे. चोरट्यांनी सासवड गावाजवळ या पाईपलाईनला भगदाड पाडले. यामुळे हजारो लिटर पेट्रोलचा जमिनीत निचरा झाला. मात्र, हिंदुस्थान पेट्रोलियमच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. ही पाईपलाईन फोडल्यानंतर वेळीच अलार्म वाजल्यामुळे मोठी दुर्घटना टाळण्यात कंपनीच्या कर्मचाऱ्यांना यश आलं आहे.परंतु, पेट्रोल जमिनीत मुरल्याने चक्क दोन विहिरी या पेट्रोलने भरल्या आहेत. यामध्ये आजु बाजुच्या शेतांतील उभ्या पिकांचे देखील नुकसान झाले आहे. पाईपलाईनची गळती काढण्याचे काम यशस्वी झाले आहे. या घटनेचा तपास संबधित विभाग आणि लोणंद पोलीस करीत आहेत.