महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.९ मार्च । मुंबई । लॉकडाऊननंतर आज प्रथमच राज्याच्या विजेच्या मागणीने विक्रमी टप्पा गाठला. उद्योग-व्यवसाय पूर्ण क्षमतेने चालू झाल्याने विजेचा वापर वाढला असून तापमानाचा चढलेला पारा आणि कृषी पंपाच्या वाढलेल्या वीज वापरामुळे आज महावितरणकडे गेल्या वर्षाभरातील सर्वाधिक 22 हजार 751 मेगावॅट एवढय़ा मोठय़ा प्रमाणात विजेची मागणी नोंदली आहे. सदरची मागणी पूर्ण करण्यासाठी महानिर्मितीनेही आज रेकॉर्डब्रेक 10 हजार 97 मेगावॅट एवढी वीजनिर्मिती केली आहे. पुढील काही दिवस विजेच्या मागणीचा हाच उच्चांक कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
कोरोना महामारीमुळे राज्याभरात लावलेल्या लॉकडाऊनमुळे सुरुवातीला महावितरणकडे नोंदली जाणारी विजेची मागणी 12 हजार मेगावॅटपर्यंत खाली आली होती. त्यानंतर सरकारने टप्प्याने उद्योग-व्यावसाय सुरू करण्यासाठी परवानगी दिल्याने विजेच्या मागणीत कमालीची वाढ झाली आहे. त्यातच कृषीपंपाचाही वीज वापर वाढला आहे. त्यामुळे महावितरणकडे विजेची विक्रमी मागणी नोंदली आहे. सदरची विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणने महानिर्मितीकडून 10 हजार 97 मेगावॅट, खासगी वीज प्रकल्पातून 6 हजार 759 मेगावॅट आणि केंद्रीय एक्स्चेंजमधून 7 हजार 405 मेगावॅट वीज घेतली आहे. लॉकडाऊननंतर महावितरणकडे विजेची सर्वाधिक मागणी नोंदलेली असतानाच महानिर्मितीनेही 10 हजार 97 मेगावॅट एवढय़ा मोठय़ा प्रमाणात वीजनिर्मिती करून आपली क्षमता सिद्ध केली आहे.