महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१० मार्च । अहमदाबाद । जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्यामुळे जून महिन्यातच होणाऱ्या आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ दुसऱ्या फळीतील खेळाडूंसह मैदानात उतरण्याची शक्यता बळावली आहे. यानंतर इंग्लंडविरुद्ध त्यांच्याच मायभूमीत कसोटी मालिका होणार असल्याने भारताचे खेळाडू तेथेच राहण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यावर कोणता तोडगा काढणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताने ३-१ असे यश संपादन करून १८ ते २२ जूनदरम्यान साउदम्पटन येथे न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीतील स्थान पक्के केले. मात्र जून महिन्याच्या अखेरीस श्रीलंकेत आशिया चषकाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याशिवाय ऑगस्टपासून भारत-इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.
‘‘भारताचे खेळाडू जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्याला प्राधान्य देणार असून इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तेथेच थांबण्याची शक्यता आहे. कारण आशिया चषकासाठी थेट श्रीलंकेला रवाना झाल्यास त्यांना इंग्लंड दौऱ्यापूर्वी पुन्हा विलगीकरणाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे आशिया चषक पुढे ढकलण्याचा पर्यायही अयोग्य ठरत आहे. अशा स्थितीत भारतीय संघ दुसऱ्या फळीतील खेळाडूंसह आशिया चषकात सहभागी होईल,’’ असे ‘बीसीसीआय’च्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, हार्दिक पंडय़ा हे खेळाडू प्रामुख्याने भारताच्या तिन्ही संघांत खेळताना दिसतात. त्यातच जैवसुरक्षित वातावरणाचा विचार करता भारत किमान २० ते २५ खेळाडूंच्या चमूसह इंग्लंडला जाणार, हे निश्चित आहे. अशा परिस्थितीत श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, दीपक चहर, यजुर्वेद्र चहल, टी. नटराजन यांसारखे मर्यादित षटकांच्या सामन्यातील खेळाडू आशिया चषकात भारताचे प्रतिनिधित्व करू शकतात. ऑक्टोबर महिन्यात भारतात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या पाश्र्वभूमीवर यंदा आशिया चषकातील सामने २० षटकांचे खेळवण्यात येणार आहेत.