महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १० मार्च – गेल्या आठवडाभरात पारा दररोज एका अंशाने वाढताना दिसतो आहे. होळीनंतर थंडी हद्दपार होऊन कडक उन्हाळ्याला सुरवात होत असते. होळी 28 मार्चला आहे; तत्पूर्वीच उन्हाचा तडाखा सुरू झाला आहे.
सकाळी नऊ-साडेनऊ पासूनच ऊन तापू लागले आहे. दुपारी 12 ते 3 या वेळेत गेल्या आठवडाभरात सरासरी ३२ ते ३३ डिग्री तापमान नोंदवले गेले. गेल्या 23 फेब्रुवारीला दुपारची सर्वोच्च तापमान नोंद 31 डिग्री होती. त्यानंतर पारा वाढतच गेला असून गेल्या पंधरा दिवसांत दुपारच्या तापमानात सरासरी तीन डिग्रीने वाढ झाली आहे.
हा ऋतूबदलाचा काळ आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने, एरवी दररोज अडीच तीन लिटर पाणी घेत असाल; तर त्यात अर्धा ते एक लिटरची वाढ करा. ते क्षारयुक्त असावे. लिंबू-मीठ सरबत वाढवा. उष्माघातापासून बचावासाठी डोकं झाकूनच बाहेर पडा. रक्तदाबाच्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी. त्यांना चक्कर येणे, ताप येणे असे त्रास संभवतात.