राज्यात तापमानाचा पारा वाढणार; इतर काही राज्यांमध्ये अवकाळीची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.११ मार्च । मुंबई ।गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात प्रचंड गारठा पसरलेला होता. त्यातच अधूनमधून अवकाळी पाऊसही पडत होता. आता अवकाळी पावसाच्या थैमानानंतर महाराष्ट्रातील काही जिल्हे उन्हानं तापू लागले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात उन्हाच्या झळा बसायला सुरुवात होणार आहे. राज्यात तापमानात वाढ झाल्याची माहिती हवामान विभागाने दिलीय. (Weather Forecast: Temperature mercury will rise in the state; So the possibility of untimely in some other states)

राज्यात 10 मार्चला काही भागांत कमाल तापमान 37-39 डिग्री सेल्सियस इतके राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. विदर्भातील अनेक जिल्ह्यांना आज उन्हाचा तडाखा बसलाय. अकोला 39 डिग्री सेल्सियस, यवतमाळ 39.4 डिग्री सेल्सियस तापमान नोंदवलं गेलंय.
गेल्या काही दिवसांपासून हवामानात वेगवान बदल दिसून येत आहेत. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 11 मार्चपासून उत्तर भारतात रिमझिम पाऊस पडू शकतो. हवामान खात्याने येत्या दोन दिवसांत अनेक राज्यात वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिलाय. येत्या दोन दिवसांत उत्तराखंड, हिमाचल, काश्मीर, लडाखसह देशांतील बर्‍याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि ओडिशामध्ये 11 ते 13 मार्च दरम्यान हलका पाऊस पडेल, तर आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, किनारी कर्नाटक आणि सौराष्ट्र आणि कच्छचा काही भागात जोरदार पाऊस कोसळेल. तसेच काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आलीय.

स्कायमेट या खासगी माहिती देणार्‍या संस्थेने म्हटले आहे की, येत्या 48 तासांत छत्तीसगड, तेलंगणा, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, किनारी कर्नाटक आणि सौराष्ट्र आणि कच्छ येथे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हिमालयीन राज्यात काही ठिकाणी हिमवृष्टी होण्याची शक्यता असून, उत्तराखंडमधील बर्‍याच भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *