महाविकास आघाडी सरकारमध्ये (MVA Government) मोठे फेरबदल केले जाणार ? शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं ठरलं,

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१५ मार्च । मुंबई । वेगवेगळ्या प्रकरणांमुळे टीकेच्या धनी सापडलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये (MVA Government) मोठे फेरबदल केले जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. अखेर या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले असून होळी आणि पोर्णिमेनंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये फेरबदल (mva government cabinet reshuffle) केले जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.पूजा चव्हाण (pooja chavan), सचिन वाझे (Sachin Vaze Arrested) अटक प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकार बॅकफूटवर गेले आहे. त्यामुळे तातडीने डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहे. वर्षा बंगल्यावर जाऊन शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा प्रस्ताव मांडला.

त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले. त्यानंतर तिन्ही नेत्यांनी मंत्रिमंडळात फेरबदल करण्यास एकमत व्यक्त केले. ‘मंत्रिमंडळात फेरबदलासंदर्भात सोनिया गांधी, शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील. लवकरच तुम्हाला याबद्दल कळेल, अशी सूचक प्रतिक्रिया नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर दिली. मिळालेल्या माहितीनुसार, होळी आणि पौर्णिमेनंतर महाविकास आघाडीतील काही मंत्र्यांचे खाते हे बदलले जाणार आहे.अनिल देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी असले तरी त्यांच्या कामगिरीवर नाराज असल्याचे बोललं जात आहे. गेले वर्षभर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खात्यावर अनेक प्रश्नं उपस्थित करण्यात आले होते. सुशात सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण ते आताचे सचिन वाझे प्रकरणापर्यंत गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख चोख कामगिरी करू शकले नाहीत, अशी भूमिका महाविकास आघाडीच्या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांमध्ये आहे.

शिवसेनेचे रिक्त झालेले वन मंत्रालय तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील गृहमंत्रिपदी नवीन मंत्र्यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे. वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा याआधीच मंजूर झाला असल्यामुळे त्यांच्या खात्याची जबाबदारीही शिवसनेच्या मंत्री मंडळाबाहेरील नव्या व्यक्तीवर सोपवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.तसंच काँग्रेस अंतर्गतही काही फेरबदल होण्याची शक्यता व्यक्तं करण्यात येत आहे. या संदर्भात काँग्रेसचे दिल्लीतील ज्येष्ठ नेते निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लवकरच महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार मंत्रिमंडळात फेर बदलाचे संकेत मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *