महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१५ मार्च । नवी दिल्ली । राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणं 1 एप्रिलपासून महागणार आहे. कारण भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) टोल दरात 5 टक्क्यांनी वाढ करणार आहे. यासह मासिक पासच्या किंमतीही 10 ते 20 रुपयांनी वाढू शकतात. एनएचएआय (National Highways Authority of India) प्रत्येक आर्थिक वर्षात टोल टॅक्स वाढवते. FASTag च्या टोल टॅक्समध्ये वाढ केल्याने सर्वसामान्यांपासून ते ट्रांसपोर्टर्सपर्यंत सर्वांना याचा फटका बसणार आहे. (Driving on National highways will be more expensive from 1st April)
मिळालेल्या वृत्तानुसार गोरखपूरमधील तीन टोल प्लाझांवरील टोल दर 5 ते 30 रुपयांनी वाढणार आहेत. नयनसार, टेनुआ आणि शेअरपूर चामराह येथील टोल वसुलीच्या आधारे अधिकारी लवकरच टोल दर वाढविण्याचा प्रस्ताव पाठवणार आहेत. याद्वारे मासिक टोलमध्येही 10 ते 20 रुपयांची वाढ होणार आहे, त्यामुळे राष्ट्रीय महामार्गांवरुन ये-जा करणाऱ्या लोकांचा खर्च वाढू शकतो. NHAI गोरखपूर झोन प्रकल्प संचालक सीएम द्विवेदी म्हणाले की, “टोल टॅक्स प्रत्येक आर्थिक वर्षात वाढतो. नवीन दर 1 एप्रिलपासून लागू होणार असून हा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.”
16 फेब्रुवारीपासून FASTag अनिवार्य
देशात 16 फेब्रुवारीपासून FASTag सर्व वाहनांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानंतर टोल वसुलीत प्रचंड वाढ झाली आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) च्या म्हणण्यानुसार, फास्टॅगमुळे टोल वसुली 104 कोटींवर गेली आहे.