महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १६ – मुंबई – जागतिक बाजारात कच्च्या तेलात सध्या तेजी आहे. मात्र तरीही पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालसह इतर राज्यांमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांमुळे कंपन्यांनी इंधन दरवाढ टाळली आहे.आज मंगळवारी सलग १७ व्या दिवशी इंधन दर जैसे थेच आहेत. आज मुंबईत पेट्रोल ९७.५७ रुपयांवर कायम आहे. एक लीटर डिझेलचा भाव ८८.६० रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९१.१७ रुपये आहे. डिझेलचा भाव ८१.४७ रुपये आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९३.१७ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८६.४५ रुपये भाव आहे.
आज कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९१.३५ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८४.३५ रुपये झाला आहे. बंगळुरात पेट्रोल ९४.२२ रुपये असून डिझेल ८६.३७ रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८९.७६ रुपयांचा विक्रमी दर आहे. भोपाळमध्ये आज पेट्रोलचा दर ९९.२१ रुपयांवर स्थिर आहे.जागतिक बाजारात आज तेलाच्या दरात किंचित घसरण झाली आहे. आज मंगळवारी सिंगापूरमध्ये डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव १.०१ डॉलरने घसरला आणि ६४.९५ डॉलर झाला तर ब्रेंट क्रूडचा भाव ०.९७ डॉलरने घसरून ६८.४६ डॉलर झाला.
कच्च्या तेलाच्या मर्यादित पुरवठ्यामुळे जागतिक कमॉडिटी बाजारात सध्या तेलाच्या किमतीत तेजी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. गेल्या आठवड्यात कमॉडिटी बाजारात तेलाचा भाव ७० डॉलर प्रती बॅरलपर्यंत वाढला होता.अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी अर्थव्यवस्ठेला उर्जितावस्था देण्यासाठी नव्या आर्थिक पॅकेजचे संकेत दिले आहेत. त्याशिवाय कर महसूल वाढवण्यासाठी अमेरिकन सरकराने करवाढ करण्याची तयारी केली आहे. त्याचा परिणाम डॉलरच्या मूल्यावर दिसून आला.