महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१७ मार्च । सिडनी । क्रिकेटमध्येही अाता एमबीए करता येणार अाहे. याचेच विविध देशांतील विद्यार्थी हे जगातील सर्वात श्रीमंत म्हणून अाेळख असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीअाय) कार्यपद्धती अाणि अल्पावधीत लाेकप्रिय ठरलेल्या आयपीएलच्या अायाेजनाचा खास अभ्यास करणार अाहेत. कारण, बीसीसीआय अाणि आयपीएल हे याच क्रिकेट अभ्यासक्रमातील एक भाग असणार अाहे.
क्रिकेटमध्ये एमबीए हा अाश्चर्याचा धक्का देणारा निर्णय अाॅस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी अाॅफ न्यू साऊथ वेल्सने घेतला अाहे. या ठिकाणी या अभ्यासक्रमाला सुरुवात हाेणार अाहे. आयपीएलच्या अायाेजनातील बारकावे अाणि त्यासाठीची कार्यपद्धती ही एमबीएचे विद्यार्थी अभ्यासणार अाहेत. यातून जगभरातील क्रिकेट मंडळाच्या प्रशासनावर युवा खेळाडू अभ्यासकांचा समावेश व्हावा, याच उद्देशाने हा निर्णय घेण्यात अाला. अाॅस्ट्रेलियन क्रिकेट प्लेअर्स असोसिएशनने ही संकल्पना सुचवली हाेती. यावर अाॅस्ट्रेलियातील नामांकित विद्यापीठाने तातडीने निर्णय घेतला. त्यामुळे अाता क्रिकेटमध्ये एमबीए करणारे विद्यार्थी हे प्रॅक्टिकलचा विषय म्हणून भारत दाैरा करतील.
प्रशासनात खेळाडूंचा टक्का वाढण्यावर भर
अांतरराष्ट्रीय मैदाने गाजवणारे खेळाडू सर्वगुणसंपन्न असतात. मात्र, यातील सर्वांनाच क्रिकेट मंडळावर कार्य करण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे सर्व काही माहीत असूनही त्यांना यापासून वंचित राहावे लागते. मात्र, साैरव गांगुली, स्मिथ, अँड्र्यू स्ट्राॅस, रिकी पाँटिंग हे अपवाद अाहेत. त्यामुळे यांच्यासारख्या प्रशासनात यशस्वीपणे कार्य करणाऱ्या खेळाडूंचा टक्का वाढावा, यावर अधिक भर देण्यात येणार अाहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशासनातील बारकावे शिकवण्यात येणार अाहेत.
प्रवेश फी ५६ लाख; १% रक्कम सीए भरणार
तीन वर्षांच्या या पदवीमध्ये स्पोर्ट्स गव्हर्नन्स, मार्केटिंग, फॅन एंगेजमेंट, मीडिया, स्पोर्ट्स लाॅ अाणि इव्हेंटबाबत शिकवले जाणार अाहे. या अभ्यासक्रमासाठी एक लाख अाॅस्ट्रेलियन डॉलर (५६ लाख) प्रवेश फी ठेवण्यात अाली अाहे. यातील एक टक्का रक्कम ही क्रिकेट अाॅस्ट्रेलिया (सीए) भरणार अाहे. या एमबीएसाठी १२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात अाली.त्यामुळे या सर्वांच्या प्रवेशादरम्यान क्रिकेट अाॅस्ट्रेलियाच्या वतीने अार्थिक मदत करण्यात अाली. याच्या दुसऱ्या सेमिस्टरला जुनमध्ये सुरुवात करण्यात येईल.
बीसीसीअायवर अभ्यास; विद्यार्थी भारत दाैऱ्यावर
क्रिकेटमधील एमबीए हा तीन वर्षांचा काेर्स असेल. याला प्रवेश घेणारे विद्यार्थी हे अभ्यासासाठी भारत दाैऱ्यावर येणार अाहेत. या ठिकाणी त्यांना बीसीसीआयची कार्यपद्धती कशी, कशा पद्धतीने मंडळ निर्णय घेते, यासारख्या बारकाव्यांच्या गाेष्टी समजून घ्याव्या लागणार अाहेत. तसेच बीसीसीआयने युवांसाठी सुरू केलेल्या प्रोफेशनल लीग आयपीएलच्या अायाेजनाबाबतही हे विद्यार्थी अभ्यास करतील. हे सर्व काही अभ्यासाचा भाग म्हणून विद्यापीठाकडून डिझाइन करण्यात अाले अाहे.