महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१७ मार्च । पुणे । राज्यात दोन दिवस वादळ, वारे अन् विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. विदर्भात 18 मार्चपासून, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणात 19 व 20 रोजी पावसामुळे ‘यलो अलर्ट’ दिला आहे.
पाकिस्तानसह भारतातील जम्मू-काश्मीर भागात पश्चिमी चक्रवात तयार झाल्याने 17 मार्चपासून हिमालयात जोरदार बर्फवृष्टी होणार आहे. त्यामुळे उत्तर भारतात बर्याच ठिकाणी वादळी वार्यासह पावसाचा अंदाज आहे. तसेच कर्नाटक ते मध्य महाराष्ट्र व पुढे मध्य प्रदेशपर्यंत वार्यांची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने महाराष्ट्रात दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. महाराष्ट्रात हा पाऊस येण्यास दोन दिवस लागतील. 18 मार्चपासून विदर्भात, तर 19 व 20 मार्च रोजी राज्यभर वादळ वारे अन् मोठ्या पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
या जिल्ह्यांत ‘यलो अलर्ट’ नाशिक, जळगाव, बीड, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, वर्धा, भंडारा, गडचिरोली, नंदुरबार, धुळे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, अकोला, वाशिम, नांदेड, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत जोरदार वादळी वारे, विजांचा कडकडाट अन् मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.