महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१७ मार्च । नवीदिल्ली । सर्वसामान्यांसाठी एक खूशखबर असून मोदी सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी ‘मेरा रेशन’ नावाचं मोबाईल अॅप लाँच केलं आहे. ज्यामध्ये गरजू म्हणजेच गरीब कुटुंबीतील लोकांना रेशन दुकानांसोबत रेशन कार्डमध्ये आपली सध्याची स्थिती आणि रेशन कार्ड धारकांना मिळणा-या सुविधांबाबत सर्व माहिती मिळू शकणार आहे. ‘मेरा रेशन’ मोबाईल अॅप हे स्मार्ट फोनसाठी लाँच करण्यात आलं आहे. त्यामुळे गुगल प्ले स्टोरवरून युजर्स हे डाऊनलोड करू शकतात. सध्या भारतात कुटुंबातील एका सदस्याकडे तरी स्मार्टफोन असतो. त्यामुळे मोबाईलवर सरकारी योजना आणि मिळणारा लाभ याची संपूर्ण माहिती मिळू शकते. ‘वन नेशन वन रेशन कार्ड’च्या पावलावल पाऊल टाकत आता ‘मेरा रेशन’ हे मोबाईल अॅप लाँच करण्यात आलं आहे. रेशन कार्ड धारक जर आपलं निवासस्थान बदलून नवीन ठिकाणी जात असेल तर ते मोबाईल अॅपवर अधिक माहिती मिळवू शकतात. जवळ कोणतं रेशन दुकान आहे, त्या ठिकाणी कोणकोणत्या सुविधा दिल्या जात आहेत हे ते पाहू शकतात. सरकारी डेटानुसार, देशात 69 कोटी लोक हे ‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्या’चा लाभ घेत आहेत. त्यांना सर्व सुविधा मिळत आहे. याचा सर्वसामान्यांना मोठा फायदा होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्या’ नुसार, या अॅक्टचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड धारकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे केवळ 1 रुपये ते 3 रुपये प्रति किलोग्रॅम या प्रमाणे धान्य मिळते. ही सुविधा 32 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमधील कोट्यवधी लोकांना मिळत आहे. आता ‘माझे रेशन’ अॅप द्वारे याचा लोकांना फायदा होणार आहे. सध्या हे अॅप हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषेत दिले आहे. मात्र आता लवकरच 14 भाषांमध्ये ते उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.