महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१८ मार्च । मुंबई । हिंदुस्थान-इंग्लंड दरम्यानचा चौथा टी-20 क्रिकेट सामना उद्या, 18 मार्चला प्रेक्षकांच्या गैरहजेरीत रंगणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत ‘टीम इंडिया’ 2-1 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे मालिकेतील आव्हान राखण्यासाठी विराट कोहलीच्या सेनेला आता जिंकावेच लागणार आहे. दुसरीकडे इंग्लंडला मालिका विजयासाठी केवळ एका विजयाची गरज आहे. त्यामुळे हिंदुस्थानसारख्या खडतर दौऱयावर मालिका जिंकण्यासाठी इंग्लंडचा संघ आतूर झाला आहे.
‘टीम इंडिया’कडे रोहित शर्मा, लोकेश राहुल, कर्णधार विराट कोहली, इशान किशन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पांडय़ा असा जबरदस्त फलंदाजी क्रम आहे. मात्र मागील तिन्ही लढतींत पॉवर प्लेच्या षटकांमध्ये टॉप गिअरमध्ये फलंदाजी करण्यात हिंदुस्थानची आघाडीची फळी अपयशी ठरली. त्यानंतर मधल्या फळीच्या दडपणामुळे मुक्तछंदात फलंदाजी करता आली नाही. परिणामी ‘टीम इंडिया’ला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली नाही. इशान किशन आणि कोहली वगळता इतर फलंदाज टी-20 शैलीत फलंदाजी करू न शकल्याने ‘टीम इंडिया’ मालिकेत पिछाडीवर पडली आहे.
इंग्लंडच्या फलंदाजीवर अंकुश ठेवण्यात हिंदुस्थानी गोलंदाज अपयशी ठरत आहेत. जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत शार्दुल ठाकूरला संधीचे सोने करता आले नाही. भुवनेश्वर कुमारने धावा रोखल्या, पण नव्या चेंडूवर एक-दोन बळी लवकर मिळवून द्यायला हवेत. प्रमुख फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल महागडा ठरतोय. त्यामुळे इंग्लंडला ही मालिका जिंकण्याची संधी निर्माण झाली आहे. डावखुरा अष्टपैलू राहुल तेवातिया संधीच्या प्रतीक्षेत आहे. आता ‘टीम इंडिया’ला मालिका जिंकण्यासाठी सर्वच स्तरावर चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
या मालिकेत लक्ष्याचा पाठलाग करणारा संघ जिंकत आलाय, मात्र हिंदुस्थानात ऑक्टोबरमध्ये टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. त्यामुळे घरच्या मैदानाचा फायदा उठवायचा असेल तर हिंदुस्थानने नाणेफेकीवर अवलंबून राहता कामा नये. प्रथम फलंदाजी असो किंवा गोलंदाजी तरी जिंकायलाच हवे, असे स्पष्ट मत कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले आहे.