दूरदर्शनवरील ‘गजरा’ या कार्यक्रमाचे निर्माते विनायक चासकर यांचे निधन

Spread the love

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१८ मार्च । मुंबई ।दूरदर्शनवर गाजलेल्या ‘गजरा’ या कार्यक्रमाचे निर्माते विनायक चासकर यांचे बुधवारी पहाटे वृद्धापकाळाने ठाण्यात निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. 1975 साली दूरदर्शनवरून प्रसारित होणाऱ्या ‘गजरा’ कार्यक्रमाला विनायक चासकर यांनी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. त्यांच्या गजऱ्याचा सुगंध महाराष्ट्रात दूरवर पोहोचला होता.

विनायक चासकर मूळचे इंदूरचे. दिल्लीच्या राष्ट्रीय नाटय़ विद्यालयातून पदवी घेतल्यानंतर ते मुंबई दूरदर्शन केंद्रावर निर्माते म्हणून रुजू झाले. त्यांनी मराठी नाटय़ विभाग, रंजन मंच, चित्रपट समालोचन इत्यादी विभाग सांभाळले. गेल्या दोन वर्षांपासून ते ठाणे येथे राहत होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

दूरदर्शन मुंबईच्या स्थापनेपासून म्हणजे 1972 सालापासून चासकर तिथे कार्यरत होते. या काळात त्यांनी अनेक दर्जेदार आणि लोकप्रिय कार्यक्रमांची निर्मिती केली. त्यापैकी ‘गजरा’ हा त्यांचा सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम ठरला. याचे 80 पेक्षा अधिक भाग प्रसारित झाले. या कार्यक्रमातून लक्ष्मीकांत बेर्डे, दिलीप प्रभावळकर, किशोर प्रधान, शोभा प्रधान, शं. ना. नवरे, रत्नाकर मतकरी, सुमती गुप्ते, विनय आपटे, सुरेश खरे आदी कलाकार लोकप्रिय झाले. चासकर यांची निर्मिती असलेल्या ‘स्मृतिचित्रे’ या फिल्मला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. तसेच ‘आश्रित’ नाटकाला दूरदर्शनचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. निवृत्तीनंतरही त्यांनी दूरदर्शनसाठी अनेक मालिकांचे दिग्दर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *