राज्यात वीजबिल वसुलीचा धडाका; ऊर्जा विभागाने केला हा दावा

Spread the love

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१८ मार्च । मुंबई ।नवीन कृषीपंप वीज जोडणी धोरणाला राज्यातील शेतकरी सकारात्मक प्रतिसाद देत असून आतापर्यंत ५.८२ लाख शेतकऱ्यांनी थकीत कृषीपंप विजबिलापोटी ५११ कोटी २६ लाख रुपयांची रक्कम भरली आहे, असा दावा ऊर्जा विभागाकडून करण्यात आला आहे. प्रलंबित वीजजोड प्रकरणी तात्काळ कार्यवाही आणि थकीत वीजबिल वसुलीसाठी भरघोस सवलत देण्याच्या या नवीन कृषीपंप वीज जोडणी धोरणाची आखणी ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या पुढाकारातून करण्यात आली आहे. ( Maha Krishi Urja Abhiyan Latest News )

कृषी ग्राहकांना सवलतीसह वीजबिल वसुलीसाठी महावितरणमार्फत ‘ महाकृषी ऊर्जा अभियान ‘ राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत भरणा करण्यात आलेल्या ५११ कोटी २६ लाख रकमेवर २५६ कोटी रुपयांची सूट देण्यात आली आहे. एकूण ५ लाख ८२ हजार ११४ शेतकऱ्यांनी ही थकबाकी भरली आहे. यात पुणे विभागात सर्वाधिक थकबाकी भरण्यात आली आहे. राज्यातील ४४ लाख ४४ हजार कृषिपंप ग्राहकांकडे ४५ हजार ७८५ कोटी रुपयांची थकबाकी असून या नवीन योजनेमुळे एकूण ३० हजार कोटी रुपयांची सूट देण्यात येणार आहे. या योजनेला मिळत असलेला प्रतिसाद सतत वाढत असून थकबाकी भरणाऱ्या शेतकऱ्यांचे राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आभार मानले आहेत. तसेच सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन थकबाकीमुक्त होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

तीन वर्षांच्या कालावधीसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे सप्टेंबर २०१५ पूर्वीच्या थकबाकीवरील सर्व व्याज व विलंब आकार माफ होणार आहे. तसेच सप्टेंबर २०१५ नंतरच्या थकबाकीवरील विलंब आकार पूर्णपणे माफ होणार असून महावितरणने घेतलेल्या कर्जावरील व्याजाच्या सरासरी दराने थकबाकीवर व्याज आकारण्यात येणार आहे. हे लाभ देऊन सुधारित करण्यात आलेल्या सप्टेंबर, २०२० च्या देयकातील सुधारित मूळ थकबाकीवर पहिल्या वर्षी भरल्यास ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. अशाप्रकारे पहिल्या वर्षी संपूर्ण थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना जवळपास ६६ टक्के सवलत मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *