विद्यार्थ्यांनी परीक्षेसंदर्भातील अफवांवर विश्वास ठेवू नये : बोर्डाचे स्पष्टीकरण

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१९ मार्च । पुणे । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावी बोर्डाची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान तर बारावी बोर्डाची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे दरम्यान प्रचलित पद्धतीने व मंजूर आराखड्यानुसार आयोजित करण्यात आली आहे. त्याचबरोबर कोरोनाचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव पाहता बोर्डाकडून पुढील दोन दिवसात मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात येणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

तसेच 12 एप्रिल ते 28 एप्रिल 2021 दरम्यान इयत्ता दहावी प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा, तर 5 एप्रिल ते 22 एप्रिल 2021 या कालावधीत इयत्ता बारावी प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव राज्यात अद्यापही सुरू आहे. या अनुषंगाने उपरोक्त परीक्षा सुरक्षित व सुरळीतपणे तसेच निर्धारित कालावधीत पार पाडण्याच्या दृष्टीने मंडळ स्तरावर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

त्याचबरोबर विविध समाजमाध्यमे आणि प्रसारमाध्यमांमध्ये इयत्ता दहावी, बारावी परीक्षे संदर्भात विविध बातम्या, अफवा प्रसारित होत असल्यामुळे या परीक्षेबाबत संबंधित घटकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. सर्व संबंधित घटकांना मंडळामार्फत आवाहन करण्यात आले आहे, अशा कोणत्याही संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये.

मंडळाच्या संकेतस्थळावर यासंदर्भात वेळोवेळी पूर्वीप्रमाणे अधिकृत निवेदने प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर एप्रिल-मे 2021 मधील लेखी, प्रात्यक्षिक परीक्षा बाबत मंडळाकडून विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना दोन दिवसात निर्गमित करण्यात येत आहेत. त्याचे काटेकोरपणे पालन करत सर्व विद्यार्थ्यांनी उपरोक्त परिक्षांना मुक्त वातावरणात सामोरे जावे, असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *