महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २१ – अहमदाबाद – भारताने इंग्लंडविरुद्ध पाचव्या व अखेरच्या टी-२० सामन्यात ३६ धावांनी शानदार विजय मिळवला. भारताने ३-२ ने मालिका जिंकली. नंबर वन संघ इंग्लंड विरुद्ध टी-२० मालिका विजयाची हॅटट्रिक केली.नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने २ बाद २२४ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात इंग्लंड ८ बाद १८८ धावा करू शकला. भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा लयीत परतला. त्याने ३४ चेंेडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ६४ धावा केल्या. रोहितने कर्णधार कोहलीसोबत पहिल्या गड्यासाठी ९४ धावांची भागीदारी केली. विराटने ५२ चेंडूंत ७ चौकार व २ षटकार खेचत नाबाद ८० धावा ठोकल्या. त्याने आपले एकूण २८ वे व मालिकेतील तिसरे अर्धशतक झळकावले. सूर्यकुमार यादवने ३२ व हार्दिक पांड्याने झटपट नाबाद ३९ धावा केल्या. इंग्लंडच्या बेन स्टोक्सने रोहित आणि सॅम करेनने सूर्यकुमारला बाद केले.
इंग्लंडकडून सलामीवीर जोस बटलर व डेव्हिड मलानने अर्धशतकी खेळी केली. बटलरने ३४ चेंडूंत ५२ धावा केल्या. मलानने ४६ चेंडूंत ६८ धावा काढल्या. शार्दूल ठाकूरने ३, भुवनेश्वर कुमारने २ बळी घेतले.
सलग ८ मालिका अजेयचे स्वप्न भंगले
या सामन्यातील पराभवासह इंग्लंडचे सलग आठ मालिका अजेय राहण्याचे स्वप्न भंगले. भारताविरुद्ध २०१८ मधील पराभवानंतर इंग्लंडने सात मालिका जिंकल्या होत्या. एक बरोबरीत राखली होती. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१९ मध्ये घरच्या टी-२० मालिका पराभवानंतर अजेय आहे.