महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २२ – नांदेड – नांदेडमध्ये 25 मार्चपासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बंद होम डिलिव्हरीसाठी किराणा, दूध विक्रीला 12 वाजेपर्यंत परवानगी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर सारख्या मोठ्या शहरांमध्ये लॉकडाउनला विरोध केला जात आहे. पण, नांदेडसारख्या छोट्या शहरात मात्र कडक लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी संपूर्ण परिस्थितीचा विचार करुन अखेर 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश जारी केले.
प्रशासनाच्या पत्रकानुसार, नांदेड जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक होत असून सर्वंकष विचार करता कोरोनाग्रस्तांची संख्या व त्याचा प्रादुर्भाव अधिक वाढू न देणे व्यापक हिताचे आहे. याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या कठोर उपाययोजनांचा गांभिर्याने विचार करून तातडीने निर्णय घेण्याबाबत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज सकाळी सर्व विभाग प्रमुखांसोबत ऑनलाईन बैठकीत निर्देश दिले होते.
कोरोना विषाणूचा (कोवीड-19) प्रादुर्भाव व प्रसार टाळण्याच्या हेतूने जिल्ह्यात कलम 144 अन्वये नांदेड जिल्हयात 5 किंवा 5 पेक्षा जास्त लोक सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास बंदी लावण्यात आली आहे. महानगरपालिका / नगरपरिषद/ नगरपंचायत / ग्रामीण क्षेत्राकरिता परिशिष्ट अ, ब प्रमाणे सूचना निर्गमीत करण्यात आल्या आहेत. यात सार्वजनिक / खाजगी क्रिडांगणे / मोकळया जागा, उदयाने, बगीचे हे संपूर्णतः बंद राहतील. तसेच सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग व इव्हिनिंग वॉक प्रतिबंधित राहील.