पिंपरी चिंचवड , पुण्यात पावसाची कुठे रिमझिम तर कुठे मुसळधार हजेरी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २२ – पुणे – महाराष्ट्रातील काही भागात कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढल्यानं रविवारी दुपार पासून अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. पुण्यातही काही भागात जोरदार तर काही ठिकाणी पावसाचा तुरळक शिडकावा झाला. दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह तुरळक पाऊस झाला. तर सिंहगड रस्त्यावर मुसळधार पाऊस झाला. सातारा रस्ता, सहकारनगर अरण्येश्वर परिसरातही हलक्या सरी पडल्या. तसेच पिंपरी चिंचवड मधील काही भागात तुरळक पाऊस झाला तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.

दरम्यान, अचानक आलेल्या अवकाळी आणि वादळी पावसाने पिकांचंही नुकसान झालं आहे. आंबेगाव जुन्नर परिसरात गारपीटसुद्धा झाली. यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे. आंबा बागेसह इतर पिकांचे मोठं नुकसान झालं आहे.

चारच दिवसांपूर्वी हवामान विभागाने शनिवारपासून पावसाची शक्यता वर्तवली होती. कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीय स्थितीमुळे राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण तयार झाले होते. समुद्र सपाटीपासून दीड किमी उंचीवर चक्रीय स्थितीचं क्षेत्र तयार झालं होतं. याची तीव्रता वाढल्यानं महाराष्ट्रात विदर्भातील काही भागात पाऊसही झाला. हवामान बदलामुळे हा पाऊस पडत असून विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागात यामुळे ढगाळ वातावरण आहे. गेल्या चार दिवसात विदर्भात वर्धा जिल्ह्यात तर नागपूरमध्ये पूर्व मोसमी पाऊस झाला. याशिवाय रविवारी मध्य महाराष्ट्रासह इतरत्र पावसाचं वातावरण झालं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *