महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २२ – पुणे – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकरच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहे. सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये मधल्या फळीत फलंदाजी केल्यानंतर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने वन डे क्रिकेटमध्ये सलामीचा फलंदाज म्हणून खेळताना धावांचा पाऊस पाडला होता. आता टीम इंडियाची मधली फळी मजबूत वाटत असल्यामुळे विराट कोहली यानेही आगामी टी-20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मासोबत सलामीला फलंदाजी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
अहमदाबाद येथे भारत -इंग्लंड येथे शनिवारी पाचवा टी-20 सामना पार पडला. या लढतीत सुमार फॉर्ममधून जाणाऱया लोकेश राहुलला वगळण्यात आले. त्यामुळे मधल्या फळीत खेळणाऱया विराट कोहलीला रोहित शर्मासोबत सलामी फलंदाज म्हणून मैदानात उतरावे लागले. या लढतीत दोघांनी 94 धावांची सणसणीत भागीदारी रचली. रोहित शर्माने 64 धावांची आणि विराट कोहलीने नाबाद 80 धावांची खेळी केली. दोघांच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे टीम इंडियाने इंग्लंडवर मालिका विजय संपादन केला. याच खेळीमुळे विराट कोहलीचा आत्मविश्वास उंचावला.
सध्या भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी कमालीची चुरस दिसून येत आहे. प्रत्येक स्थानासाठी लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळेच मधल्या फळीतही एकापेक्षा एक असे सरस फलंदाज आहेत. सूर्यकुमार यादव, इशान किशन, श्रेयस अय्यर, हार्दिक पांडय़ा, रिषभ पंत यांच्यावर टीम इंडियाच्या व्यवस्थापनाला कमालीचा विश्वास आहे. तसेच गरज पडल्यास लोकेश राहुल, शिखर धवन, मयांक अग्रवाल, मनीष पांडे हेदेखील मधल्या फळीत फलंदाजी करू शकतील. त्यामुळे विराट कोहली व रोहित शर्मा हे दोघेही कोणत्याही दबावाविना सलामीला फलंदाजी करू शकतात.