महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. २२ मार्च –
* कस्टमर केअरचा नंबर (Customer Care)गुगल सर्चवर जाऊन कधीही कस्टमर केअरचा नंबर सर्च करु नका. कोणत्याही कंपनीच्या कस्टमर केअरचा नंबर गुगलवर सर्च करणे टाळले पाहिजे. बरीच लोकं कोणत्याही सर्व्हिससाठी गुगलवर जाऊन कस्टमर केअरचा नंबर सर्च करतात. सायबर गुन्हेगार लोकांच्या याच सवयीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात आणि बनावट कंपनी तयार करुन चुकीच्या कस्टमर केअरचा नंबर वापरुन तुमच्याकडून तुमची वैयक्तिक माहिती गोळा करतात आणि आपल्या बँक अकाउंटविषयी माहिती घेऊ शकतात.
* बँक वेबसाइट्स (Bank Website)आजकाल ऑनलाईन बँकिंगचा जास्त वापर केला जातो आणि यासाठी गुगलचा आधार घेतला जातो. जर तुम्ही गुगल सर्चवर जाऊन बँकेची वेबसाइट सर्च करत असाल तर काळजी घ्या. असं करणं तुमच्यासाठी धोकादायक असू शकते. सायबर गुन्हेगार बँकेची डुप्लिकेट वेबसाइट तयार करतात आणि बँकेच्या अधिकृत वेबसाइटप्रमाणे दुसरी युआरएल ठेवतात. अशामध्ये युजर्स गोंधळून जातात आणि हॅकर्सच्या जाळ्यात अडकतात. यामुळे आपले नुकसान होते. ऑनलाइन बँकिंगच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी बँकेच्या वेबसाइटची यूआरएल टाइप करुनच वेबसाइटवर जा.
* अॅप्स, फाइल आणि सॉफ्टवेअर (App, file, Software)जर तुम्हाला तुमच्या मोबाइलमध्ये कोणत्या अॅप किंवा सॉफ्टवेअर पाहिजे असेल तर नेहमी प्ले स्टोअरवरुनच डाऊनलोड करा. बरेच लोक हे अॅप्स गुगलवरुन डाऊनलोड करतात जे प्ले स्टोअरवर साडपत नाहीत. आपण कोणतीही फाइल, सॉफ्टवेअर आणि अॅप्स डाऊनलोड करण्यासाठी नेहमी गुगल सर्चचा वापर करतो. असं करणं खूपच धोकादायक होऊ शकते. कोणत्याही चुकीच्या लिंकला ओपन केल्यामुळे आपल्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये धोकादायक व्हायरस किंवा मेलवेअर शिरू शकतं. हा व्हायरस आपली वैयक्तिक माहिती गोळा करण्याव्यतिरिक्त कम्प्युटरमधील फाइल्सवर परिणाम करु शकतात.
* गुंतवणूक आणि पैसे कमवण्याचे मार्ग ; प्रत्येक व्यक्ती चांगल्या लाइफस्टाइलसाठी पैसे कमवू इच्छिते. यासाठी अनेक जण गुगलवर जाऊन सर्च करतात. गुगल सर्चवर जाऊन कधीही तुम्ही गुंतवणूक आणि पैसे कमावण्याचे मार्ग शोधू नका. हॅकर्स सर्वात आधी त्या लोकांना टार्गेट करतात ज्यांना पैसे कमवायचे असतात. यासाठी हॅकर्स बनावट कंपनी आणि वेबसाइट तयार करून तुमची फसवणूक करु शकतात.
* गुगलवरुन वैद्यकीय सल्ला घेणं टाळा ; काही लोक त्यांच्या आजाराच्या उपचारासाठी आणि औषधांसाठी गुगलवर सर्च करतात. गुगलवर नमूद केलेले सर्व उपचार आणि औषधे आपल्यासाठी योग्य असतील हे गरजेचे नाही. गुगल सर्चवर कोणत्याही आजार आणि औषधांविषयी सर्च करु नका. असं केल्यामुळे तुम्हाला चुकीच्या औषधाविषयी माहिती मिळेल आणि त्याचे सेवन केल्यामुळे तुमच्या आरोग्याला धोका निर्माण होईल.