महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २४ – पुणे – राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पुण्यातील रुग्णसंख्या वाढत असली तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे तूर्तास लॉकडाऊन नको, असे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले. (Pune Corona situation is under control no need to lockdown immediately said murlidhar mohol)
“पुण्याची रुग्णसंख्या वाढत असली तरी परिस्थिती नियंत्रणात असून तूर्त लॉकडाऊन व्यवहार्य ठरणार नाही, अशी माझी भूमिका आहे. टाटा समाजशास्त्र संस्था आणि ‘आयसर’ ने केलेल्या अभ्यासातही पूर्णतः लॉकडाऊन ऐवजी निर्बंध वाढवावेत, असं सुचवलं आहे,” असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
“आताच्या परिस्थितीत आरोग्य यंत्रणा सक्षम करणे, टेस्टिंग वाढवणे आणि लसीकरण व्यापक स्वरूपात करणे आपण यावर वेगाने काम करत आहोत. त्यामुळे पूर्णतः लॉकडाऊन करण्यापेक्षा आणखी कडक नवे निर्बंध लावता येतील का? यावर चर्चा अपेक्षित आहे,” असेही मुरलीधर मोहोळ म्हणाले.
दिवसभरात नवे ३ हजार ०९८ कोरोनाबाधित!
पुणे शहरात आज नव्याने ३ हजार ०९८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता २ लाख ४० हजार ८३४ इतकी झाली आहे.#PuneFightsCorona
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) March 23, 2021
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात हॉटस्पॉटने शंभरी गाठली आहे. अवघ्या दहा दिवसात पुणे ग्रामपंचायतीची संख्या दुपटीने वाढली आहे. त्यामध्ये हवेली, जुन्नर, खेड, मुळशी या तालुक्यांतील हॉटस्पॉट ग्रामपंचायतींची संख्या तब्बल दहाच्या पुढे आहे. तर फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला.गेल्या महिन्याभरात ग्रामीण आणि नगरपालिका हद्दीतील दहापेक्षा अधिक करोनाबाधित संख्या असलेल्या 46 ग्रामपंचायतींचा समावेश होता. त्यानंतर चारच दिवसांत या हॉटस्पॉट संख्येमध्ये 21 ने वाढ झाली. मात्र या संख्येने आता तब्बल शंभरीचा आकडा गाठला आहे.
पुण्यातील कोरोना स्थिती
पुण्यात काल दिवसभरात 3 हजार 98 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 1 हजार 698 रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात काल मृत्यूचं प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यात काल दिवसभरात 31 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील 9 मृत हे पुण्याबाहेरील असल्याचं सांगण्यात आलं आहे. पुण्यात सध्या 24 हजार 440 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यातील 555 जण गंभीर आहेत. (Pune Corona situation is under control no need to lockdown immediately said murlidhar mohol)