महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पुणे – दि. २४ मार्च – राज्यातील अनेक भागांत गेल्या चार ते पाच दिवस धुमाकूळ घातल्यानंतर आता अवकाळी पावसाचा प्रभाव कमी होणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने मंगळवारी वर्तविला. मात्र, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात ढगांच्या गडगडाटासह बुधवारी (ता. २४) पाऊस पडेल, असा इशाराही दिला. राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत असलेली चक्रीय वाऱ्याची स्थिती छत्तीसगडच्या दिशेने पुढे सरकली. कर्नाटकाच्या किनारपट्टीच्या भागात या स्थितीचा प्रभाव अधिक प्रमाणात होता. तसेच मध्य प्रदेशाच्या आग्नेय भागात चक्रीय स्थिती असून, समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर होती. त्यामुळे राज्यातील पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण कमी होण्यास सुरुवात झाली आहे.
राज्यात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे किमान व कमाल तापमानात चांगलीच घट झाली आहे. दिवसभर काही अंशी कोरडे हवामान असले, तरी दुपारनंतर होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे तापमान कमी-जास्त होत आहे. कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत नऊ अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. विदर्भात चाळिशी पार झालेला पारा पुन्हा झपाट्याने खाली आला आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान रत्नागिरी येथे ३७.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले. राज्यातील सर्वांत कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १५.८ अंश सेल्सिअस होते.
शहर आणि परिसरात दिवसभर आकाश अंशतः ढगाळ होते. काही भागात पावसाच्या हलक्या सरींनी हजेरीदेखील लावली. त्यामुळे चाळीशीच्या दिशेने झेपावत असलेला किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा २.३ अंश सेल्सिअसने कमी होऊन ३३.९ अंश सेल्सिअस नोंदला गेला. शहरात पुढील बुधवारी आकाश ढगाळ राहून दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता खात्यातर्फे वर्तविण्यात आली.